जालना : बंद असलेले घर हेरून चोरी करणारे व सार्वजनिक ठिकाणाहून गर्दीचा फायदा घेत दुचाकी पळविणाऱ्या टोळीचा जालना दरोडा प्रतिबंधक पथकाने पर्दाफाश केला आहे. पाच आरोपींना गजाआड करत त्यांच्याकडून २३ दुचाकींसह साडे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मागील काही दिवसांपासून चोऱ्या व दुचाकी पळविण्याच्या घटना वाढल्या होत्या. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण होते. चोरट्यांना तात्काळ ताब्यात घेवून गुन्हे उघडकीस आणण्याचे आवाहन जालना पोलिसांसमोर होते. हाच धागा पकडून जालना पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवली. याचवेळी एडीएसचे प्रमुख पो.नि.यशवंत जाधव यांना घरफोडी करणारे दोघे परतूर तालुक्यातील आष्टीची माहिती मिळाली. त्यांनी सापळा लावून अंगद पंडीतराव थोरात व अमोल शिवाजी थोरात यांना ताब्यात घेतले. खाक्या दाखविताच त्यांनी आपला गुन्हा कबूल केला.
त्यानंतर दुचाकी चोरीच्या तपासाला सुरूवात केली. २० आॅगस्ट रोजी आनंद शहादेव खुळे (रा.भिवगाव, ता.देऊळगांव राजा), दिगंबर बाबासाहेब किंगर (रा.भोसा, ता.सिंदखेड राजा) व बालाजी विजय बरकूले (रा.आष्टी, ता.परतूर) यांना ताब्यात घेतले. चौकशी केली असता त्यांनी जालना, औरंगाबाद जिल्ह्यातून दुचाकी चोरल्याचे कबूली दिली. या दुचाकी कोठे विक्री केल्या, याचा तपास केला असता आरोपींनी सात जणांची नावे सांगितली. त्यांचा शोध पोलिसांकडून घेतला जात असून त्यांच्या विरोधातही कारवाई केली आहे. या टोळीकडून २३ दुचाकी व इतर असा सहा लाख दहा हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर बाजार पोलिस ठाणे हद्दीतील दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. सध्या ताब्यातील सर्व आरोपींना पोलिस कोठडी दिली आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक एस.चैतन्य, अप्पर पोलिस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा प्रतिबंधक प्रमुख यशवंत जाधव, एम.बी.स्कॉड, रामप्रसाद रंगे, फुलचंद हजारे, नंदकिशोर कामे, संदिप चिंचोले, राजू पवार, श्रीकुमार आडेप, सचिन आर्य यांनी केली.