सोलापूर : शहरात गेल्या महिन्यापासून बुरखा पांघरुन सराफ दुकानात ग्राहक बनून दागिने चोरणाऱ्या टोळींची सुळसुळाट वाढला आहे. तिन्ही दुकानांमध्ये अशा प्रकारे दागिने गायब झाल्याबद्दल शहर पोलिसात गुन्हे नोंदवले आहेत. या घटना सिद्धेश्वर पेठ, अशोक चौक, भारतरत्न इंदिरानगर या ठिकाणी सायंकाळच्या सुमारास घडल्या.
पहिली घटना अशोक चौकातील राजेश ज्वेलर्समध्ये शुक्रवारी (दि. २४) सायंकाळी साडेचार ते साडेपाच या वेळेत घडली. येथील दुकानाचे मालक राजेश अंबादास पेंडम (वय- ३०, रा. साईबाबा चौक, न्यू पाच्छा पेठ, सोलापूर) यांनी जेलरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यात म्हटले आहे की, फिर्यादीच्या दुकानात चार अज्ञात बुरखाधारी महिला ग्राहक म्हणून आल्या. फिर्यादीच्या वडिलांचे लक्ष विचलित करुन त्यांनी हातचलखीने दुकानातील सोन्याची पत्ती, बदाम, सोन्याची काडी असा ५९ हजार २०० रुपयांचा ऐवज चोरुन धूम ठोकल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस नाईक सोनार या प्रकरणी तपास करीत आहेत.
दुसरी घटना १५ मे रोजी सायंकाळी सहा ते साडेसहाच्या सुमारास सिद्धेश्वर पेठेतील अरमान ज्वेलरी येथेही अशाच पद्धतीने ७२ हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या पिन (फुलाच्या आकाराची मोरणी) चा बुरखाधारींनी चोरुन नेल्या, या प्रकरणी ज्वेलरीचे मालक आसिफ बशीर शेख (वय- ३८, हाजी हजरत चाळ, मुरारजी पेठ, सोलापूर) यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात सोमवारी फिर्याद नोंदविली आहे. तपास पोलीस नाईक मुलाणी करीत आहेत.
तिसरी आणखी एक घटना ५ एप्रिल रोजी भारतरत्न इंदिरानगर ७० फूट रोड येथील शिवकुमार ज्वेलर्समधून चौघा बुरखाधारींनी मालक खुर्शीदआलम अब्दुल समद शेख (वय- ३७) व कामगारांचे लक्ष विचिलत करुन ६ हजार ४०० रुपयांचे ८ तोळे वजनाचे चांदीचे पैंजन चोरुन पळून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे. तपास हवालदार इप्पलपल्ली करीत आहेत.
तिन्ही चोऱ्या एकाच टोळीच्या?सायंकाळची वेळ गाठून सराफ दुकानात शिरुन ग्राहक असल्याचा बनाव करुन दागिने चोरुन नेताना तिन्ही चोरीमध्ये चार अज्ञात बुरखाधारी असल्याचे फिर्यादीचे म्हणणे आहे. यावरुन हे एकाच टोळीचे काम असावे या दृष्टीने पोलिसांनी शोधमोहीम जारी ठेवली आहे.