पोलिसांपासून आणि स्थानिक नागरिकांच्या तक्रारींपासून वाचण्यासाठी फरीदाबादमध्ये सेक्स रॅकेट चालविण्याची अनोखी शक्कल लढविली जात होती. देहविक्रय करणाऱ्या तरुणींना कारमधूनच शहरभर फिरविले जात होते. अशा सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिलेला पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे.
पोलिसांना एका सेक्स रॅकेटबाबत माहिती मिळाली होती, परंतू या रॅकेटचा ठावठिकाणा नसल्याने कारवाई कशी करायची असा प्रश्न पडला होता. पैसे मिळताच त्या तरुणी कोणत्याही हॉटेलमध्ये गिऱ्हाईकासोबत जात होत्या. हे रॅकेट चालविणारे लोक तरुणींशी फोनवरूनच संपर्क करत असायचे. यानंतर त्या तरुणी तिथे पोहोचविल्या जायच्या. गिऱ्हाईकाला फोटो पाठविले जायचे. त्याला निवडायला सांगितले जायचे. यानंतर एक कार गिऱ्हाईकाने सांगितलेल्या ठिकाणी यायची, पैसे घेतले जायचे आणि तरुणी त्यावेळी कारमधून खाली उतरायची.
असा सारा खेळ गेल्या सहा महिन्यांपासून सुरु होता. अखेर पोलिसांनीच कस्टमर बनून त्या रॅकेटला फोन केला. एका हॉटेलजवळ बोलविले. साध्या वेशात असलेल्या पोलिसाला पलीकडून तरुणींचे फोटो पाठविण्यात आले. त्याने त्यातील एक तरुणी निवडली. त्या तरुणीला घेऊन दहाच मिनिटांत कार तिथे आली. पोलिसाने कारमध्ये बसलेल्या महिलेकडे सहा हजार रुपये दिले. तिने त्यातील दोन हजार रुपये कारच्या चालकाला दिले. तसेच तरुणीला कारमधून उतरविले.
पोलिसाने सिग्नल देताच दबा धरून बसलेली पोलिसांची टीम तिथे पोहोचली आणि महिलेसह कारमधील तीन तरुणी आणि एक चालक असे पाच जणांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींना एनआयटी पोलीस ठाण्यात नेऊन वेश्याव्यवसायाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.