शेरेबाजीचा विरोध केला अन् थोबाडीत लगावली म्हणून महिलेच्या चेहऱ्यावर ब्लेडनं वार, ११८ टाके!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2022 10:59 AM2022-06-12T10:59:20+5:302022-06-12T11:02:34+5:30
मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. बाइकवर आपल्या पतीसोबत जाणाऱ्या एका महिलेवर नराधमांनी ब्लेडनं वार करुन तिला गंभीररित्या जखमी केलं आहे.
भोपाळ-
मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. बाइकवर आपल्या पतीसोबत जाणाऱ्या एका महिलेवर नराधमांनी ब्लेडनं वार करुन तिला गंभीररित्या जखमी केलं आहे. या घटनेत महिलेच्या चेहऱ्यावर एक दोन नव्हे, तर तब्बल ११८ टाके पडले आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार संबंधित घटना भोपाळच्या टीटी नगर परिसरातील आहे. पीडित महिला एका डॉक्टरच्या दवाखान्यात काम करते. काही नामानिमित्त महिला आपल्या पतीसोबत बाइकवरुन बाजारात गेली होती. तिचा पती एका दुकानात पाणी घेण्यासाठी गेला असता बाइक जवळ उभ्या असलेल्या त्याच्या पत्नीला पाहून काही नराधम तिथं आले आणि शेरेबाजी करू लागले. महिलेनं रागाच्या भरात भर बाजारात नराधमांपैकी एकाला पकडलं आणि जोरदार थप्पड लगावली. महिलेनं आरडाओरडा सुरू केला आणि त्यांना चांगलंच सुनावलं. त्यानंतर नराधम तिथून निघून गेले.
महिला जेव्हा पतीसोबत बाइकवरुन घरी जायला निघाली तेव्हा ते नराधम परत आले आणि तिच्या चेहऱ्यावर ब्लेडनं वार करुन पळाले. वार इतका खोलवर गेला की महिला गंभीर जखमी झाली. यात महिलेच्या डोळ्यालाही जखम झाली. जखमी महिलेनं दिलेल्या माहितीनुसार तिला चेहऱ्यावर ११८ टाके पडले आहेत. हल्लेखोर आरोपी अजूनही फरार आहेत.
डीसीपी साई कृष्णानं दोन अज्ञातांवर कलम ३२४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असून हल्लेखोरांचा शोध घेतला जात असल्याचं डीसीपी साई कृष्णा यांनी सांगितलं आहे.