मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एक व्यक्ती नवीन टाटा हॅरियर घेण्यासाठी शोरूममध्ये पोहोचला आणि टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने कार घेऊन पळून गेला. पण त्या व्यक्तीला पोलिसांच्या हातून वाचता आलं नाही. पोलिसांच्या सतर्कतेमुळे अवघ्या काही तासातचं त्याच्याकडून गाडी जप्त करण्यात आली.
एक व्यक्ती गाडी खरेदी करण्याच्या बहाण्यानं शोरुममध्ये पोहोचला. त्यानंतर तो टेस्ट ड्राईव्ह घेण्याचं सांगून पळून गेला. जसं त्यानं गाडीसह पळ काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा एजन्सीच्या लोकांनीही लांबवर त्याचा पाठलाग केला. परंतु ती व्यक्ती गाडी घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाली, अशी माहिती एसपी मुकेश श्रीवास्तव यांनी दिली. दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनीही संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी करत १० हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ४ तासांनंतर पोलिसांना एक गाडी बेवारस स्थितीत एका ठिकाणी उभी असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी ती गाडी आपल्या ताब्यात घेतली. तसंच गाडी घेऊन पळ ठोकलेल्या आरोपींनाही अटक केली. गाडी मिळवून देणाऱ्या पोलिसांनाही ५० हजार रुपयांचं बक्षीस देण्याची घोषणा एजन्सीकडून करण्यात आली आहे.