नवी दिल्ली - पती-पत्नीमध्ये कौटुंबिक कारणामुळे वाद होत असतात. कधी कधी क्षुल्लक कारणावरून सुरू झालेला वाद टोकालाही जातो. भांडणाचे विविध किस्से हे सातत्याने समोर येत आहे. अशीच एक घटना समोर आली आहे. आपल्या पत्नीपासून दूर राहण्यासाठी एका पतीने अनोखी शक्कल लढवली. थेट खोटा 'कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट' तयार केला. कोरोनाचा रिपोर्ट पत्नीला पाठवला आणि आपण कोविड सेंटरमध्ये भरती असल्याचं सांगितलं. मात्र त्याचं हे खोटं फार दिवस लपून राहिलं नाही. शेवटी पत्नीला सत्य समजलं आणि नवऱ्याची पोलखोल झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये ही घटना घडली आहे. एका व्यक्तीने पत्नीपासून दूर राहण्यासाठी कोरोनाचा पॉझिटिव्ह असल्याचा खोटा रिपोर्ट तयार करून घेतला आणि पत्नीला आपण उपचारासाठी कोविड सेंटरमध्ये दाखल असल्याचं देखील सांगितलं. एक महिन्याहून जास्त दिवस झाले तरी पती घरी परत आला नाही. त्यामुळे पत्नीला त्याच्यावर संशय आला. तिने आपल्या वडिलांना या कोरोना रिपोर्टची सत्यता तपासून पाहायला सांगितली. सासऱ्याने जावयाचा रिपोर्ट ज्या लॅबमधून काढला गेला होता तिथे चौकशी केली.
अधिक चौकशी केली असता हा रिपोर्ट खोटा असल्याचं समोर आलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी 2021 मध्ये एजाज अहमद यांच लग्न झालं होतं. तो एका व्यापाऱ्याचा मुलगा आहे. काही कारणांमुळे त्याच्या वैवाहिक जीवनात तणाव निर्माण झाला होता. एजाज आणि त्याच्या पत्नीमध्ये सारखा विविध कारणांवरून वाद होत असे. त्यामुळेच त्याला आपल्या पत्नीपासून दूर राहायचे होते. एजाज अहमदने फोटोशॉपचं एक App आपल्या फोनमध्ये डाऊनलोड केलं आणि इंदूरच्या सेंट्रल लॅबच्या एका कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या रिपोर्टमध्ये आपला नाव टाकलं आणि तो फोटो कुटुंबियांना दाखवला.
एजाज कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समजून त्याची पत्नी आणि कुटुंबीय त्याच्यापासून दूर राहू लागले. पण काही दिवसांनी त्याच्या पत्नीला थोडा संशय आला कारण एजाजमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणं आढळून आली नव्हती. तसेच तो बरा होता. मग असं असताना रिपोर्ट कसा पॉझिटिव्ह आला याचा तिने आपल्या वडिलांना शोध घेण्यास सांगितलं. त्यावेळी लॅबने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या जागी एजाजने आपलं नाव एडीट केल्याची माहिती दिली आणि हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.