इंदुरमध्ये पोलिसांसमोर असलेल्या नकली पोलीस अधिकारी केसमद्ये रोज नवनवे आश्चर्यकारक खुलासे होत आहेत. पोलिसांच्या चौकशीतून समोर आलं की, आरोपी तरूणासोबत जो तांत्रिक छोटू महाराज पोलिसांच्या ताब्यात आहे. हा महाराज मुळात पुरूष नसून एक महिला आहे. ती पुरूषाचं रूप धारण करून महिलांची फसवणूक करते. चौकशीतून समोर आलं की, तांत्रिक छोटू महाराज विवाहित आहे आणि ती पतीसोबत वाद झाल्यावर इंदुरला पळून आली होती.
कसा झाला खुलासा
काही दिवसांपूर्वी नकली पोलीस अधिकारी बनून फिरणारा एक तरूण रवि सोलंकी याला अटक करण्यात आली होती. रविने नकली पोलीस अधिकारी बनून चांगल्या घरातील एका तरूणीसोबत साखरपूडा केला होता आणि तिच्या नातेवाईकांना त्याच्यावर संशय होता. ज्यामुळे त्यांनी पोलिसात तक्रार दिली. तक्रारीनंतर आरोपी तरूणाला अटक केली आहे. तरूणाच्या अटकेनंतर समजलं की, तो नकली पोलिसवाला बनून तांत्रिक छोटू महाराजसोबत मिळून महिलांची फसवणूक करतो.
यानंतर पोलिसांनी छोटू महाराज उर्फ सीमानंदला अटक केली. पोलिसांना चौकशी दरम्यान समजलं की, छोटू महाराज मुळात एक महिला आहे जी पुरूष बनून महिलांची फसवणूक करत होती. सीमाचं लग्नाही झालं आहे. पण पतीसोबत वाद झाल्यानंतर सीमाने घर सोडलं. त्यानंतर दोन वर्ष ती एक व्यक्तीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिली. यादरम्यान तिने ब्युटी पार्लरही चालवलं. दोन वर्षांनी तिच्या जोडीदाराने तिला सोडलं. त्यानंतर ती तांत्रिक बनून महिलांना फसवू लागली.
दोघे एकत्र करत होते फसवणूक
चौकशीतून समोर आलं की, छोटू महाराज आपल्याकडे येणाऱ्या महिलांना रवि सोलंकीसोबत भेटवत होती. रवि सोलंकी लोकांना तो आयपीएस अधिकारी असल्याचं सांगत होती. दोघे मिळून महिलांना नोटांचा पाऊस करून दाखवत होते. त्यांचा एक साथीदार तांत्रिक प्रेम आत्म्यांकडून नोटांचा पाऊस पाडण्याचा दावा करत होता. छोटू महाराज आणि रवि सोलंकी महिलांकडून पैसे घेऊन नोटांचा पाऊस पाडून त्यांचे पैसे डबल करणार असं सांगत होते.
यानंतर सगळे लोक पीडितांना प्लॅन करून स्मशान भूमीत नेत होते आणि तिथे तंत्र क्रिया करून ढोंग करत होते. यादरम्यान पीडितांना ते सांगत होते की, त्यांना तंत्र क्रियांदरम्यान घाबरायचं नाहीये. नाही तर तंत्र अपयशी होईल. यावेळी हे लोक भीतीदायक आवाज काढत होते जेणेकरून पीडित लोक आपसूक पळून जात होते. अशाप्रकारेच ते लोकांना फसवत होते.