मुंबई : दादरा - नगर हवेलीचे अपक्ष खासदार मोहन संजीभाई डेलकर (५९) यांचा मंबईतील मरिन ड्राईव्ह येथील सी ग्रीन साऊथ हॉटेलमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ माजली आहे. मुंबई पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांचे पथक दाखल झाले असून पोलिसांकड़ून तपास सुरु करण्यात आला आहे. घटनास्थळी पोलिसांना गुजराती भाषेत सुसाईट नोट सापडली आहे.
मोहन डेलकर यांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. आज दुपारी १२ वाजता हॉटेलमधून पोलिसांना या धक्कादायक घटनेची माहिती मिळाली. हॉटेलच्या पाचव्या मजल्यावर डेलकर यांचा मृतदेह आढळून आला. डेलकर यांच्या पश्चात पत्नी कालाबेन डेलकर आणि एक मुलगाअभिनव, एक मुलगी दिविता असा परिवार आहे. १९८९ मध्ये ते पहिल्यादा दादरा आणि नगर हवेली मतदारसंघातून अपक्ष म्हणून लोकसभेवर निवडून आले होते. १९९१ आणि १९९६ मध्ये ते काँग्रेसतर्फे पुन्हा लोकसभेवर निवडून गेले होते. त्यानंतर १९९८ मध्ये भाजपकडून ते लोकसभेत आले. १९९९ मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून आणि २००४ मध्ये भारतीय नवशक्ती पार्टीतर्फे त्यांनी लोकसभेची जागा मिळवली होती.