Madhya Pradesh Crime News : मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका तरूणाने आपल्या गर्लफ्रेन्डचे खर्च उचलण्यासाठी स्वत:च्या अपहरणाचं नाटक रचलं आणि घरातील लोकांकडून अडीच लाख रूपये मागितले. पोलिसांच्या चौकशीतून हा खुलासा झाला. या घटनेसाठी आरोपी तरूणाने एक मोबाइल अॅपचा आधार घेतला होता. पोलिसांनी तरूणाला अटक केली आहे.
भिंड जिल्ह्यातील गोहद पोलीस स्टेशनमध्ये सुरेंद्र सिंह कुशवाह नावाच्या व्यक्तीने ६ नोव्हेंबरला आपला १८ वर्षीय मुलगा संदीप बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. त्यांनी सांगितलं की, तो घरातून गेला आणि मग परत आलाच नाही. ८ नोव्हेंबरला पीडित वडिलाकडे एक फोन आला, ज्यात त्यांना सांगण्यात आलं की, त्यांचा मुलाचं अपहरण करण्यात आलं आहे आणि त्याला सोडवण्यासाठी अडीच लाख रूपये पाहिजे. मुलाचं अपहरण झाल्याचं ऐकून घाबरलेले वडील पोलीस स्टेशनमध्ये गेले.
मुलाच्या वडिलांनी पोलिसांना याची माहिती दिल्यावर पोलिसांची चौकशी सुरू केली. चौकशीनंतर त्यांना संदीप ग्वाल्हेरमध्ये असल्याची माहिती मिळाली. मोबाइल लोकेशन ट्रॅक करत पोलीस त्या ठिकाणापर्यंत पोहोचले. तरूणाने आधी तर पोलिसांनी अनेक खोट्या कथा सांगितल्या. शेवटी त्याने मान्य केलं की, त्याने त्याच्या अपहरणाचं नाटक रचलं होतं. तो त्याच्या मर्जीने घरातून पळून गेला होता. त्याला पैशांची गरज होती आणि घरातून त्याला पैसे मिळत नव्हते. म्हणून त्याने हे कृत्य केलं.
पोलिसांनी सांगितलं की, तरूणाचं गुरूग्राममधील तरूणीसोबत प्रेम प्रकरण सुरू होतं. तिला भेटायला जाण्यासाठी आणि तिचे खर्च उचलण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. त्याने कारण सांगत घरीही पैसे मागितले होते. पण त्यांनी दिले नाही. त्यामुळे तो घरातून गायब झाला. त्यानंतर दोन दिवसांनी मोबाइलमध्ये अॅप डाऊनलोड केलं आणि त्याद्वारे आवाज बदलून वडिलांना स्वत:च फोन केला. तसेच पैशांची मागणी केली.