मुंबई: Ganpat Gaikwad: भाजपाचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यात मध्यरात्री उल्हासनगरमधील पोलीस ठाण्यामध्येच झालेल्या राड्यामुळे खळबळ उडाली. गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि त्यांच्यासोबत असलेल्या राहुल पाटील यांच्यावर गोळ्या झाडल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी, गोळीबार करणारे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
सदर प्रकरणावर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील एकनाथ शिंदे यांच्यासारखे मुख्यमंत्री असल्यास गुन्हे वाढणारच, अशी टीका केली आहे. संजय राऊतांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आरोप केले.
महेश गायकवाड यांच्यावर झालेला गोळीबार धक्कादायक आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात ही घटना घडलेली आहे. एकनाथ शिंदेच्या राजवाटीत गुंड्यांची पैदास सुरु आहे, असं संजय राऊत म्हणाले. तसेच एकनाथ शिंदेंमुळे गोळीबार केला असं, गणपत गायकवाड यांचं वक्तव्य आहे. महाराष्ट्र इतक्या रसातळाला कधीच गेला नव्हता. महाराष्ट्रात कायदा, सुव्यवस्थेचे मुडदे पडलेत, असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला.
एकनाथ शिंदेंवर केले गंभीर आरोप
आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. एकनाथ शिंदे यांनी असेच गुन्हेगार राज्यभरात पाळून ठेवले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांचं राज्य घडवण्याचं काम करत आहेत. ते मुख्यमंत्री असले तर राज्यात केवळ गुन्हेगारच पैदा होतील. आमच्यासारख्या चांगल्या माणसाला एकनाथ शिंदे यांनी आज गुन्हेगार बनवलं आहे, असा आरोपही त्यांनी केला. तसेच मी मला होत असलेल्या त्रासाबाबत भाजपामधील वरिष्ठांना कल्पना दिली होती. ही लोकं माझा वारंवार अपमान करतात. मी केलेल्या कामांच्या ठिकाणी श्रीकांत शिंदेंच्या नावाचा फलक लावला जातो, असेही आमदार गायकवाड म्हणाले.
नेमकं प्रकरण काय?
उल्हासनगरातील हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जगताप यांच्या कॅबिनमध्ये शिवसेना कल्याण पूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड आणि त्याचे साथीदार राहुल पाटील व भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांच्यामध्ये एका विषयावरून सुरवातीला बाचाबाची झाली. त्यानंतर शिवीगाळ व गोळीबार झाला. यामध्ये महेश गायकवाड यांना ४ तर राहुल पाटील यांना २ गोळ्या लागल्या आहेत. हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगताप यांच्या केबिन मध्ये रात्री अंदाजे ११ वाजता गोळीबार झाला असून यापूर्वीही महेश गायकवाड व आमदार गणपत गायकवाड यांच्या हाणामारी झाल्याचे प्रकार झाले, असे पोलिसांचे म्हणणे आहे.