डोंबिवली : वीजबिल कमी करण्याचे आमिष दाखवून वीजग्राहकांकडून रोख रक्कम स्वीकारून स्वतःच्या रक्कम शिल्लक नसलेल्या बँक खात्याचा धनादेश महावितरणकडे जमा करून महावितरणसह संबंधित ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या एका भामट्याविरुद्ध शनिवारी गुन्हा दाखल झाला.
साहिल अझगर पटेल (रा. बिस्मिल्ला हॉटेलजवळ, मौलबी चौक, गोविंदवाडी, कल्याण पश्चिम) असे या भामट्याने नाव असून त्याने एकूण २३ ग्राहक व महावितरणची दोन लाख ४० हजार ७०० रुपयांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. महात्मा फुले पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल असून, तपासात फसवणुकीची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.
कल्याण पश्चिम विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर राठोड आणि वित्त व लेखा विभागाचे उपव्यवस्थापक गजानन राठोड यांना साहिल पटेल याने विविध ग्राहकांच्या वीजबिलासाठी दिलेले धनादेश न वटल्याने संशय आला. त्यामुळे संबंधित ग्राहकांना प्रत्यक्ष कार्यालयात बोलावून राठोड यांनी चौकशी केली असता धक्कादायक बाब उघडकीस आली. परिमंडल कार्यालयाच्या परिसरातील दोन, तहसील कार्यालयासमोरील एक व शिवाजी चौकातील एक अशा विविध पतसंस्थांच्या चार बिलभरणाकेंद्रात येणाऱ्या ग्राहकांना वीजबिल कमी करून देण्याचा बहाणा करून आरोपीने त्यांच्याकडून रोख रक्कम घेतली. ती हडप करून आरोपीने संबंधित ग्राहकांच्या वीजबिलापोटी स्वतःचा आयसीआयसीआय या रक्कम शिल्लक नसलेल्या बँकेचा धनादेश बिलभरणा केंद्रात जमा करून ग्राहकांना त्याची पावती दिली. परंतु, हे धनादेश न वटल्याने कल्याण पश्चिम विभाग कार्यालयात परत आल्याने आरोपीचे कारस्थान उघड झाले. उपव्यवस्थापक गजानन राठोड यांच्या फिर्यादीवरून महात्मा फुले पोलीस ठाण्यात साहिल पटेलविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
मीटर रीडिंग, ग्राहक वर्गवारी अथवा वीजभार यासंदर्भात चुकीची नोंद झाली असेल तरच महावितरणच्या प्राधिकृत अधिकाऱ्याकडून वीजबिल दुरुस्त केले जाते. इतर कोणालाही वीजबिलात दुरुस्तीचा अधिकार नाही. त्यामुळे वीजग्राहकांनी वीजबिल कमी करून देण्याचे आमिष दाखविणाऱ्या कोणत्याही घटकाच्या आमिषाला बळी न पडण्याची दक्षता घ्यावी व फसवणूक टाळावी, असे आवाहन महावितरणने केले आहे. अशाच प्रकारच्या फसवणुकीबाबत १५ मार्च रोजी उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दीपक महादेवप्रसाद श्रीवास्तव (रा. उल्हासनगर कॅम्प-३) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, त्यालाही पोलिसांनी अटक केली आहे. या पार्श्वभूमीवर वीजग्राहकांनी कोणत्याही परिस्थितीत वीजबिलाचा भरणा डिजिटल माध्यमातून ऑनलाइन किंवा महावितरणच्या अधिकृत वीजबिल भरणा केंद्रातच करून छापील पावती घ्यावी. वीजबिल भरणा करण्याबाबत महावितरणबाह्य कोणत्याही व्यक्ती अथवा घटकांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
वीजमीटर काढण्याचे सत्र सुरूचडोंबिवली : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत आदेश देऊनही शहरात वीजबिल न भरल्याच्या कारणाने सर्रास वीजमीटर काढण्यात येत असून नागरिक हैराण झाले आहेत. शेलारनाका परिसरातील तुकाराम साबळे यांनी सांगितले की, सातत्याने आम्हाला भरमसाट बिले दिली जात आहेत. त्यात आता थेट मीटर काढण्यात येत आहेत. शासन आदेशाची पायमल्ली होत असून सामान्यांनी जगायचे तरी कसे? असा सवाल त्यांनी केला. वीजबिल पाठविल्यावर ती भरण्याची क्षमता नसेल तर टप्पे करून देण्याचे अधिकारी सांगतात, पण तरीही प्रत्यक्ष मात्र अंमलबजावणी तशी न होता मीटर काढण्याची कार्यवाही होत आहे. गोग्रासवाडी भागातही अशा समस्या भेडसावत असल्याने नागरिक हैराण आहेत. यासंदर्भात महावितरण अधिकाऱ्यांनी सांगितले की, आधी पवार तसे म्हणाले होते, पण हाऊस संपताना पुन्हा ज्यांची बिले भरमसाट आहेत त्यांचे मीटर काढण्यात यावेत, असे आदेश पारित करण्यात आले होते. त्यानुसार कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले.