लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : हायप्रोफाइल बिझनेसमनपासून बॉलिवूडच्या सेलिब्रिटीपर्यंत मोठा ग्राहकवर्ग असलेल्या मुच्छड पानवाला म्हणजेच शिवकुमार तिवारी पुन्हा एकदा पोलिस कारवाईत अडकला आहे. अमली पदार्थविरोधी विभागाने (एएनसी) केलेल्या कारवाईत पानवालासह एकूण चार ठिकाणाहून १३ लाख किमतीचा प्रतिबंधित ई-सिगारेटचा साठा जप्त केला आहे. यापूर्वीही पानवालाविरोधात २०२१ मध्ये एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात अटकेची कारवाई केली होती. सध्या तो जामिनावर बाहेर आहे.
धूम्रपान सोडण्यास मदत करण्याच्या नावाखाली शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक सिगारेटची विक्री करणाऱ्याविरोधात गुन्हे शाखेची धडक कारवाई सुरू आहे. एएनसीने गेल्या दोन दिवसांत चार ठिकाणी कारवाई केली. यामध्ये मुच्छड पानवालाच्या दुकानातही झाडाझडती घेतली. दुकानातून मोठ्या प्रमाणात ई- सिगारेटचा साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी व्हीपी रोड पोलिसांनी गुन्हा नोंदवत अटकेची कारवाई केली आहे. विविध कारवाईत याप्रकरणी एकूण चार गुन्हे नोंदवत १३ लाख ६५ हजार रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईने एकच खळबळ उडाली असून गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.
ड्रग्जही जप्त एएनसीने केलेल्या कारवाईत एका हुक्का गोडाऊनला सील ठोकून ६९९ हुक्का पॉट्स जप्त करण्यात आले. याप्रकरणी एमआरए मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तर, बोरीवलीतून १५ लाख किमतीचे कोकेन आणि एमडीचा साठाही जप्त करण्यात आला आहे.
१६ आरोपी एएनसीने गेल्या दोन दिवसांत ई- सिगारेट, हुक्का तसेच ड्रग्ज संबंधित केलेल्या कारवाईत १६ आरोपींविरोधात विविध पोलिस ठाण्यांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यापैकी १० ताब्यात असून ६ जणांचा शोध सुरू आहे.