मडगाव - वाहतूकीचे नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांवर मडगाव वाहतूक पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे. मागच्या वर्षी २0१८ साली वाहतूक नियम भंगाची एकूण ६५ हजार ८९५ प्रकरणे नोंदविण्यात आली असून एकूण ८३ लाख ८९ हजार ९00 रुपये दंड वसूल करण्यात आला. वाहतूक पोलिसांनी वाहनचालकंवर कडक वॉच ठेवल्याने अपघाती मृत्यूच्या घटनेतही घट दिसून येत आहे. २0१८ साली मडगाव वाहतूक विभाग अख्यत्यारीत ४६ जणांना अपघाती मृत्यू आला.२०१७ साली हा आकडा ५९ इतका होता.
२०१७ साली मडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण २१ जणांना अपघाती मृत्यू आला होता. मागच्या वर्षी ही संख्या ३ इतकी होती. तर मायणा - कुडतरी पोलीस ठाण्यात २०१७ साली २३ जण मृत्यू पावले होते. २०१८ साली हाच आकडा २३ इतका होता तर कुंकळळी पोलीस ठाण्यात ही संख्या दोन वर्षापुर्वी १३ तर मागच्या वर्षी ७ असे होते. फातोडर्यात २०१७ साली दोघाजणांना अपघाती मृत्यू आला तर गेल्यावर्षी १३ जणांचा मृत्यू झाला.
विना हेल्मेट दुचाकी हाकण्याचे प्रमाण वाढत आहे. आता सेन्टीलन मोहिमेमुळे घरपोच तालांव हाती मिळत असल्याने वाहन चालकांत जागृती होउ लागली आहे. मागच्या वर्षी मडगाव वाहतूक पोलिसांनी विना हेल्मेटची एकूण २३ हजार ४८८ प्रकरणे नोंदवून घेताना २३ लाख ५० हजार १५० रुपये दंड वसूल केला. वाहने चालविताना मोबाईलचा वापरही मोठया प्रमाणात होत आहे. गेल्या वर्षी पोलिसांनी अशा प्रकाराची एकूण ५३६ प्रकरणे नोंद करुन घेताना २ लाख ७३ हजार ३00 रुपये दंड वसूल केला. धोकादायक पार्किंगच्या एकूण ७८४४ प्रकरणे मागच्या वर्षी नोंद झालीत तर एकूण ७ लाख ८९ हजार ७00 रुपये दंड पोलिसांनी सरकार दरबारी जमा केला. वेगाचे उल्लंघन करणाऱ्या १६४३ वाहन चालकांना पोलिसांनी तालांव दिला व ५ लाख ४९ हजार ७00 रुपये दंड वसूल केला.
दारु पिउन वाहने चालविणाऱ्या एकूण ७६९ प्रकरणे मागच्या वर्षी नोंद झालेल्या आहेत. क्षमतेपेक्षा जास्ती प्रवासी घेणारी एकूण १३५८ प्रकरणे नोंद असून, १ लाख ३८ हजार दंड पोलिसांनी वसूल केला आहे. वाहतूक सिग्नल नियम मोडण्याच्या एकूण १९0८ प्रकरणे घडली असून १ लाख ९१ हजार ६00 रुपये दंड वाहतूक पोलिसांनी वसूल केला आहे. सिल्ट बेल्टविना चार चाकी वाहने हाकण्याच्या एकूण २३२४ प्रकरणी पोलीस दफ्तरी नोंद आहेत. दंड २ लाख ३३ हजार रुपये वसूल करण्यात आला आहे. काळया कांचाच्या एकूण २३४४ प्रकरणे घडली असून दंडापायी २ लाख ३५ हजार रुपये पोलिसांनी सरकारी तिजोरीत जमा केले आहे.
सदोष वाहन नोंदणी क्रमांक पटटीची एकूण २१०५ प्रकरणे नोंद असून, २ लाख ३१ हजार ८०० रुपये पोलिसांनी दंड वसूल केला आहे. आरशाविना वाहने चालविणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. ११५२ जणांना तालांव देउन १ लाख १७ हजार ७00 रुपये दंड पोलिसांनी वसूल केला आहे. बेकायदेशीर पार्किगच्या एकूण ३५७७ प्रकरणे घडली असून,३ लाख ५८ हजार ५00 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
वाहतुक नियम भंग करणाऱ्या चालकांचा वाहतूक परवाना रदद करण्याची शिफारसही वाहतूक पोलिसांकडून केली जात आहे. वेगमर्यादा ओलांडणाऱ्या एकूण १६४३ तर गुडस वाहनांमध्ये प्रवाशी घेणाऱ्या एकूण १५६ जणांची परवाना रद्द करण्याची शिफारस वाहतूक पोलिसांनी केली आहे. वाहने चालविताना मोबाईलचा वापर करणाऱ्या ५३६ तर दारु पिऊन वाहने चालविणाऱ्या एकूण ७६९ जणांचा परवाना रद्द करण्याचीही शिफारस वाहतूक पोलिसांनी केली आहे. वाहतुकीला शिस्त आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत असून वाहन नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली जाईल अशी माहिती मडगाव वाहतूक पोलीस विभागाचे पोलीस निरीक्षक मोहन गावडे यांनी दिली.