मुंबई - वांद्रे परिसरात जास्त रिक्षाभाडं मागत प्रवाशावर हात उगारणाऱ्या रिक्षाचालकांची मुजोरीचा व्हिडीओ वायरल झाला आहे. तसेच या रिक्षाचालकाला मनसे कार्यकर्त्यांनी मनसे स्टाईल दणका दाखवत बीकेसी पोलिसांच्या हवाली केले आहे.
मुजोर रिक्षाचालकाने प्रवाशाकडे जास्त भाडं मागत प्रवाशालाच मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ वांद्रे कुर्ला संकुल परिसरातील आहे. एका तरुणीने हा व्हिडीओ शूट केला. व्हिडीओत रिक्षाचालक तरुणावर हात उगारत त्याला धक्काबुक्कीकरत असल्याचं स्पष्ट दिसत होतं.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक 20 रुपये शेअरिंग असतानाही प्रवाशांकडे 30 रुपयांची मागणी करत होता. यावरुन तरुणाचा रिक्षाचालकासोबत वाद सुरु होता. अत्यंत मुजोर भाषेत रिक्षाचालक तरुणाशी बोलत असल्याचं व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. इतकंच नव्हे तर त्याच्याकडून जबरदस्तीने पैसे घेत हातही उगारताना व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी या रिक्षाचालकाचा शोध घेत मनसे स्टाइलने त्याला उठाबश्या काढायला लावल्या. फेसबुकवर त्यांनी यासंबंधी व्हिडीओही शेअर केले आहेत. यामध्ये मनसे कार्यकर्ते त्याला समज देत असल्याचं दिसत आहे. मनसे कार्यकर्त्यांनी या रिक्षाचालकाला बीकेसी पोलिसांच्या ताब्यात दिलं.