मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कोर्पिओ गाडी(Mukesh Ambani Bomb Scare) आढळल्यानं पोलीस दलात खळबळ उडाली होती, मात्र या प्रकरणात निलंबित अधिकारी सचिन वाझेला अटक केल्यानंतर अनेक पुरावे NIA च्या हाती लागत आहेत, यात मुख्य म्हणजे ज्या स्कोर्पिओ गाडीची मूळ नंबर प्लेट बदलून तिथे बनावट नंबर प्लेट टाकण्यात आला होता. इतकचं नाही तर गाडीचा चेसिस आणि इंजिन नंबरही बदलण्यात आला होता.
सचिन वाझेने(Sachin Vaze) विचार केला असावा की, इतक्या शिताफीने प्लॅन करूनसुद्धा स्कोर्पिओच्या मूळ मालकापर्यंत कधी पोहचू शकणार नाही, परंतु प्रत्येक गुन्हेगार काही ना काही पुरावा सोडतोच. त्याचरितीने स्कोर्पिओ गाडीतही हा पुरावा सापडला, स्कोर्पिओ गाडीच्या काचेवर खूप महिन्यांपूर्वी अगदी बारीक अक्षरात गाडीचा मूळ क्रमांक लिहून ठेवला होता.
NIA ची धडक कारवाई,‘मिस्ट्री वुमन’ला घेतलं ताब्यात; सचिन वाझेचा खेळ खल्लास?
या तपासात असणाऱ्या एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, २५ फेब्रुवारीला मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटनच्या स्फोटकांनी भरलेली गाडी आढळली होती, त्यानंतर ही गाडी अंबानी यांच्या घराबाहेरून हटवून येलो गेट पोलीस ठाणे परिसरात आणण्यात आली. त्याठिकाणी गुन्हे शाखेचे आणि एटीएसचे वेगवेगळे पथक पोहचले होते, त्यातील एका अधिकाऱ्याची नजर स्कोर्पिओच्या काचेवर पडली, तिथे खूप छोट्या अक्षरात गाडीचा नंबर लिहिला होता, या अधिकाऱ्याने त्याचा फोटो काढला त्यानंतर सिस्टमध्ये जाऊन गाडी नंबरवरून मूळ मालकाचा शोध लावला.
पीटर न्यूटनपासून मनसुख हिरेनपर्यंत पोहचली पोलीस
त्यावेळी ही गाडी डॉक्टर पीटर न्यूटन नावाने रजिस्टर्ड असल्याचं दिसून आलं, तपास पथक जेव्हा चौकशीसाठी पीटर यांच्या घरी पोहचली तेव्हा काही पैशाच्या व्यवहारातून ही गाडी मागील ३ वर्षापासून मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांच्याकडे असल्याचं समजलं, त्यानंतर मनसुख हिरेन याच्याशी संपर्क केला असता त्यांनी गाडी १७ फेब्रुवारीला विक्रोळी येथून चोरी झाली आणि स्थानिक पोलीस ठाण्यात १८ फेब्रुवारीला तक्रार केल्याचं म्हटलं.
यानंतर तपास पथक विक्रोळी पोलीस ठाण्यात पोहचले, तिथे FIR लिहिणारे अधिकारी आणि त्यावेळी उपस्थित असणाऱ्यांची चौकशी केली. विक्रोळी पोलिसांकडे चौकशी करण्यापूर्वी तपास फक्त स्कोर्पिओच्या आधारे केला जात होता, मनसुख हिरेन कुटुंबीयांचे म्हणणं होतं,ही स्कोर्पिओ सचिन वाझेकडे नोव्हेंबरपासून ५ फेब्रुवारीपर्यंत होती. मनसुख हिरेन यांच्याकडे ही गाडी ३ वर्षापासून होती, परंतु ३ वर्षात हिरेन यांनी आणि ४ महिन्यात सचिन वाझे यांनाही स्कोर्पिओच्या काचेवर बारिक अक्षरात लिहिलेला नंबर दिसला नाही, त्याचमुळे सचिन वाझेने गाडीची पुढची आणि मागची नंबरप्लेट बनावट लावण्यात आली, मात्र काचेवरील मूळ क्रमांक तसाच राहिला.
FIR नुसार, ज्या स्कोर्पिओ गाडीची चोरी होण्याची तक्रार नोंदवली, ही गाडी चोरी झालीच नव्हती असं तथ्य समोर आलं, मनसुख हिरेन यांनी १७ फेब्रुवारीला रात्री विक्रोळी येथे गाडी पार्क केली, त्याठिकाणाहून कॅब बुक करून ते सीएसटीला आले, तिथे मर्सिडीजमध्ये बसले, सचिन वाझे यांना चावी दिली. वाझे यांनी ही चावी त्याच्या सहकाऱ्याला दिली. त्यानंतर या सहकाऱ्याने विक्रोळीतून स्कोर्पिओ घेऊन ठाण्यातील साकेत बिल्डिंग बाहेर लावली, येथे ही गाडी २ दिवस होती, त्यानंतर वाझेच्या सहकाऱ्याने ही गाडी पोलीस मुख्यालयात आणली. १९ ते २१ फेब्रुवारीदरम्यान ही गाडी पोलीस मुख्यालयात पार्क केली होती.
पुन्हा गाडी सचिन वाझे याच्या इमारतीजवळ पोहचली, त्यानंतर २५ फेब्रुवारीला स्वत: गाडी चालवत सचिन वाझेने तिला मुकेश अंबानी यांच्याघराबाहेर उभी केली आणि पाठिमागून येणाऱ्या सीआययूच्या एनोव्हा कारमधून बसून निघून गेले. याचदरम्यान सचिन वाझेच्या सांगण्यानुसार मनसुख हिरेनने १८ फेब्रुवारीला विक्रोळी पोलीस ठाण्यात गाडी चोरीचा FIR दाखल करून घेतला. विक्रोळीत ज्याठिकाणी ही गाडी पार्क केली होती, तिथे आसपास ५ किमी परिसरात सीसीटीव्ही नाहीत. त्यामुळे गाडी चोरीचा प्लॅनिंग याआधीच रेकी करून केला होता. गाडी चोरी झाली असली तरी चावी मालकाकडे असते, FIR नोंदवताना गाडीची चावी कुठे? असा प्रश्न तिथे उपस्थित असणाऱ्या पोलिसांनी विचारायला हवा होता.
मनसुख हिरेन हे सराईत गुन्हेगार नव्हते, त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांच्या या प्रश्नाने त्यांची भंबेरी उडाली असती, जर ते खोटं बोलले असते, चावी घरी आहे, तर पोलिसांनी घरी व्हिडीओ कॉल करून चावी घरात कुठे आहे, ते विचारलं असतं, त्याचवेळी सगळा प्रकार समोर आला असता. कारण गाडीची चावी हिरेन सचिन वाझेला देऊन आले होते.