२५ फेब्रुवारीला प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलीया निवासस्थानाबाहेर एक स्कॉर्पिओ कार सापडली होती. त्यात जिलेटीनच्या २० कांड्या, बोगस नंबर प्लेट्स आणि धमकीचे पत्र सापडले होते. या घटनेने मुंबईत खळबळ माजली होती. नंतर अंबानींच्या मोबाईलवर धमकीचा टेलिग्राम मेसेज आला होता. हा मेसेज दिल्लीतील तिहार जेलमधील बराकमध्ये वापरत असलेल्या मोबाईलमधून आला असल्याचं तपासात समोर आलं आहे.
संबंधित फोन क्रमांक हा तिहार जेलमध्ये वापरला जात असल्याने याबाबत दिल्ली पोलीस तपास करत आहेत. तसेच या बराकमध्ये जैश ए मोहम्मद, इसिस आणि इंडियन मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांसह १५ जण हा मोबाईल वापरत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या दहशतवाद्यांपैकी कोणी एकाने धमकीचा मेसेज अंबानींना टेलिग्रामवर केला होता का ? याचा तपास पोलीस करत आहेत.
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, २६ फेब्रुवारी रोजी टेलीग्राम चॅनेल तयार करण्यात आले होते आणि अंबानींच्या निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ ठेवल्याची जबाबदारी घेणारी मेसेज २७ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा अंबानींच्या टेलिग्राम मेसेजिंग अॅपवर पोस्ट करण्यात आला होता. या मेसेजमध्ये क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे पाठवण्याची मागणी देखील केली होती आणि ती जमा करण्यासाठीच्या लिंकचा उल्लेख केला होता.चौकशीदरम्यान ती लिंक “उपलब्ध नाही” म्हणून आढळले, त्यामुळे तपास करणार्यांना हे कोणीतरी त्रास देण्यासाठी कृत्य करत असल्याचा संशय आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. नंतर २८ फेब्रुवारीला जैश-उल-हिंदचा आणखी एक मेसेज सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आला आणि घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओच्या प्रकरणात आपली कोणतीही भूमिका नसल्याचा दावा केला गेला. या प्रकरणातील तपास सुरुवातीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने केला होता. नंतर गृहमंत्र्यांनी याचा तपास एटीएसकडे सुपूर्द केला. त्यानंतर देखील या प्रकरणाचा तपास एटीएसकडून केंद्रीय तपास यंत्रणा असलेल्या NIA कडे वळविण्यात आला आहे.