मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ सापडलेल्या स्कॉर्पिओमुळे खळबळ उडाली असताना, त्याच स्कॉर्पियोच्या ठिकाणी बेवारस बेवारस दुचाकी सापडल्यामुळे खळबळ उडाली. वाहन ॲपमध्ये गाडीचा क्रमांक न सापडल्यामुळे संशय बळावला. नानाविध तर्कवितर्क सुरू असतानाच, ती दुचाकी तेथेच काम करत असलेल्या एका तरुणाची असल्याचे निष्पन्न झाले आणि पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला.
मलबार हिल येथील वाहतूक पोलिसांच्या नजरेत मंगळवारी दुपारी राखाडी रंगाची सुझुकी एक्सेस (एमएच ०१- डीडी २२२५) ही दुचाकी पडली. जिलेटिनच्या कांड्या असलेली स्कॉर्पिओ पार्क केलेल्या ठिकाणीच ती पार्क केली होती. स्कॉर्पिओ प्रकरणानंतर अधिक सतर्क झालेल्या पोलिसांनी याबाबत गावदेवी पोलिसांना कळविले.
दुचाकी क्रमांकावरून त्याच्या मालकाची माहिती मिळाली नाही. पोलिसांच्या वाहन ॲपमध्येही या क्रमांकाची कुठलीही नोंद नव्हती. त्यामुळे पोलिसांनी प्रादेशिक परिवहन विभागाकडे दुचाकीचा नोंदणी क्रमांक, इंजिन क्रमांक आणि चासी क्रमांक देऊन मालकाचे तपशील देण्याची मागणी केली.
दरम्यान, तपास पथकाने सीसीटीव्हीच्या मदतीने तपास सुरू केला. प्राथमिक चौकशीत ही दुचाकी चोरीचा असल्याचा संशय वर्तविण्यात आला. स्कॉर्पिओ आणि मनसुख हिरेन प्रकरणाशी याचा काही संबंध आहे का? या दिशेनेही पोलिसांनी तपास सुरू केला. याच दरम्यान प्रादेशिक विभागाकडून अहवाल आला आणि ती दुचाकी बेवारस नसून तिचा मालक वरळीतील रहिवासी असल्याची माहिती समाेर आली.
त्यानुसार संबंधित तरुणाशी संपर्क साधताच तो पोलीस ठाण्यात दाखल झाला. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत, ती आपली गाडी असल्याचे त्याने सांगितले. तो कारमायकल रोडवरील लोढामध्ये काम करत असल्याचे चाैकशीत समाेर आले. मंगळवारी दुचाकी पार्क करायला जागा न सापडल्याने तेथेच दुचाकी पार्क करून निघून गेलाे. त्यानंतर जेव्हा तेथे आलाे त्यावेळी तेथे दुचाकी नव्हती, असा जबाब त्याने दिला.
दुचाकी चालकाची ओळख पटली असून कागदपपत्रांची खातरजमा करून ती संबंधिताच्या ताब्यात देण्यात आल्याचे गावदेवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामप्यारे राजभर यांनी सांगितले.