मुंबई : वांद्रे पूर्वेकडील वांद्रे - कुर्ला संकुल (बीकेसी) येथून चालणाऱ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करत तिघांना बेड्या ठोकण्यास अंमलीपदार्थविरोधी कक्षाच्या वरळी पथकाला यश आले आहे. त्रिकुटाकडून दहा कोटींचे ५ किलो एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. पोलिसांनी याप्रकरणी कमरुद्दीन शेख, रियाज अन्सारी आणि सलमान खान या तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. सलमान हा जामिनावर बाहेर असताना ड्रग्ज तस्करीत सक्रिय असल्याची माहिती समोर आली आहे.
गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, बीकेसी परिसरात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज साठा करण्यात आला असून, येथून मोठ्या ड्रग्ज खरेदी-विक्री आणि पुरवठा केला जात असल्याच्या मिळालेल्या माहितीच्या आधारे वरळी युनिटचे प्रभारी पोलिस निरीक्षक संदीप काळे, सहायक पोलिस निरीक्षक संतोष साळुंखे, सहायक पोलिस निरीक्षक अमोल कदम, पोलिस उपनिरीक्षक शैलेश देसाई, पोलिस उपनिरीक्षक रवींद्र सावंत आणि पथकाने शुक्रवारी रात्री बीकेसी परिसरात गस्त सुरू केली.
बीकेसी अग्निशमन केंद्राजवळ तीन संशयित या पथकाला दिसले. पथकाने सापळा रचून कमरुद्दीन, रियाज आणि सलमान या तिघांनाही ताब्यात घेतले. झडतीमध्ये कमरुद्दीन व रियाज यांच्याजवळ १६० ग्रॅम एमडी पोलिसांना सापडले. याप्रकरणी अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवत तिन्ही आरोपींना अटक केली आहे. कमरुद्दीन आणि रियाज यांना सलमान याने हे ड्रग्ज पुरवल्याची माहिती समोर आली. त्यानुसार पोलिसांनी बीकेसी येथेच छापेमारी केली.
- सलमान हा पोलिस अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्या विरोधात २०२१ मध्ये नागपूरमध्ये वाणिज्य स्वरूपाचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात तो जामिनावर बाहेर पडल्यानंतर तो ड्रग्ज विक्रीच्या व्यवसायात सक्रिय झाल्याची माहिती गुन्हे शाखेच्या तपासात समोर आली आहे. त्यानुसार या ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश करण्यासाठी तिन्ही आरोपींकडे कसून चाैकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.