भदोही – प्रेमाच्या चक्करमध्ये एका मल्टिनॅशनल कंपनीतील सेल्समॅनला खूनी बनवलं आहे. सुरुवातीला त्याने १६ वर्षीय गर्लफ्रेंडचा गळा दाबला त्यानंतर लोखंडी बॉक्समधून बाईकवरून ४० किमी दूर जंगलात तिचा मृतदेह फेकून दिला. आरोपी युवकाने अनेक शक्कल लढवली परंतु पोलिसांसमोर त्याचे काही चालले नाही. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सापडले ज्यात युवक मुलीचा मृतदेह बाईकवरून घेऊन जाताना दिसला. पोलिसांनी आरोपी युवकाला जेलमध्ये पाठवले आहे.
बनारसच्या भिखारीपूर मंडुआडीहाचा राहणारा उपेंद्र एका मल्टिनॅशनल कंपनीत सेल्समॅन म्हणून कामाला होता. त्याच्या शेजारी १६ वर्षाची मुलगी राहत होती. या दोघांमध्ये आधी ओळख झाली त्यानंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. प्रेयसीसोबत राहण्यासाठी उपेंद्रने महामनापुरी कॉलनीत भाड्याने घर घेतले. हे दोघे नेहमी त्याठिकाणी जाऊन तासनतास तिथे राहायचे. सर्वकाही सुरळीत सुरू होते. एकेदिवशी उपेंद्रला प्रेयसीवर संशय आला. प्रेयसी आपल्या नकळत आणखी एका युवकासोबत बोलते, त्यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला.
१ सप्टेंबरला प्रेयसी प्रियकर उपेंद्रला भेटण्यासाठी त्याच्या घरी आली. दोघांनी बाहेरून जेवण मागवले आणि सोबत वेळ घालवला. दोघांमध्ये पुन्हा तिसऱ्या युवकावरून चर्चा सुरू झाली. तिथूनच वादाला सुरुवात झाली. उपेंद्र आणि प्रेयसीत भांडण झाले. त्यात रागाच्या भरात उपेंद्रने प्रेयसीची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर तिचे डोके जमिनीवर खूप वेळ आपटले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने घटनास्थळीच तिचा मृत्यू झाला.
१२०० रुपये खर्च करून लोखंडी पेटी आणली
जेव्हा मुलीचा मृत्यू झाला तेव्हा युवकाने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी प्लॅन आखला. खोली बंद करून तो बाजारात गेला आणि १२०० रुपयाला लोखंडी पेटी आणली. मृतदेह पेटीत बंद करून बाईकवरून बनारसहून भदोहीच्या दिशेने गेला. ४० किमी अंतरावरील एका निर्जनस्थळी उपेंद्रने बाईक थांबवली आणि लोखंडी पेटीवर पेट्रोल ओतून ती जाळून टाकली. त्यात मुलीचा मृतदेह जळाला. पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या सहाय्याने आरोपी युवकाला अटक केली.
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांची ६ पथके बनवण्यात आली होती. वाराणसी ते भदोही मार्गावरील २०० सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर उपेंद्र श्रीवास्तव बाईकवरून जाताना दिसला. एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये लोखंडी बॉक्स होता. फुटेजच्या आधारे पोलिसांनी उपेंद्रला अटक केली. त्याच्याजवळील बाईकही जप्त केली आहे. आरोपीला पकडणे पोलिसांसमोर आव्हान होते. हत्येचा तपास करणाऱ्या पोलीस पथकास २५ हजार बक्षीस देण्यात आले.