मुंबई - मुलुंडच्या मर्डर मिस्ट्रीचा ५ महिन्यांनी उलगडा करण्यास नवघर पोलिसांना यश आले आहे. योगेश राणे असे आरोपीचे नाव असून, तो आधीच्याच घटनास्थळी तिस-या हत्येच्या प्रयत्नात असताना नवघर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.मुलुंडमधील केळकर कॉलेजच्या मागील स्मशानभूमीजवळील ओसाड जागेत २७ जानेवारी रोजी अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी अज्ञाताविरोधात हत्या करून पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करून नवघर पोलिसांनी मुंबईसह ठाणे, नवी मुंबई परिसरातील हरविलेल्यांचा नोंदीद्वारे तपास सुरु केला. ज्यात संशय आला त्यातील संबंधित नातेवाईकांना बोलावून मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यातून काहीच हाती आले नाही. अखेर, त्यांनी केईएमच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेत फेस रेकग्निशन टेक्नोलॉजीचा वापर करून मृतदेहाच्या कवटीच्या आधारे त्याचा चेहरा तयार केला. जवळपास ६० टक्के मृत व्यक्ती तशी दिसत असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. हा चेहरा आणि मृतदेहाचे फोटो असलेली ५ हजार पत्रके मुंबईतील गर्दी तसेच झोपडपट्टी विभागात लावली. अखेर, चार महिन्याने राणे त्यांच्या हाती लागला.तपासात मृत तरुणाचे नाव विजयकुमार यादव असल्याचे उघड झाले. तो मुळचा उत्तरप्रदेशचा रहिवासी असून मुलुंडच्या विश्वभारती हॉटेलमध्ये नोकरीला होता.राणे हा देखील त्याच हॉटेलमध्ये नोकरीला होता. तो तापट स्वभावाचा आहे. यातूनच त्याचा विजयकुमारसोबत वाद झाला. त्याला धडा शिकविण्यासाठी त्याने विजयकुमारची हत्या करून त्याची ओळख पटू नये म्हणून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. धक्कादायक म्हणजे जानेवारी २०१९ पासून विजयकुमार गायब होता. मात्र हॉटेल व्यवस्थापनाने त्याकडे दुर्लक्ष केले.असा आला जाळ्यातयाच हॉटेलमध्ये काम करणाºया नवाज नेपाळीसोबतही त्याचा वाद झाला. याच वादात त्याने नेपाळीला संपविण्याचे ठरविले. ठरल्याप्रमाणे घटनास्थळी आणून त्याच्यावर वार केले. मात्र, नेपाळीने तेथून पळ काढला. आणि पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्याच्या तक्रारीवरुन चेंबूरच्या घाटला गावातून त्याला बेड्या ठोकल्या. पुढे कार्यपद्धती लक्षात घेत, त्याच्या हॉटेलमध्ये पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा, विजयकुमार गायब असल्याचे लक्षात आले. आणि हाच धागा पकडून पोलिसांनी राणेकडे चौकशी करता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.रायगडमध्येही हत्या : २०१२ मध्ये याच तापट स्वभावातून त्याने रायगडमध्ये एकाची हत्या केल्याची माहिती तपासात उघड झाली आहे.
मुलुंड मर्डर मिस्ट्री : तिसऱ्या हत्येच्या प्रयत्नात असलेला आरोपी जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 2:42 AM