मुंबई - तस्करांचं डोके खूप चलाख असते म्हणूनच ते तस्करीसाठी इतके अनोखे मार्ग शोधतात की सामान्य माणसाला त्यांचा थांगपत्ता लागत नाही. परंतु कस्टम खात्याच्या अधिकाऱ्यांपासून वाचणं कठीणच नाही तर अशक्य आहे. नुकतेच सीमाशुल्क विभागाने मुंबई विमानतळावर सुमारे १९ लाख रुपयांचे सोने जप्त केले. तस्कर हे सोने टॉफी आणि चॉकलेटच्या रॅपरमध्ये लपवून नेत असल्याचं समोर आले आहे.
सोने इतके सुबकपणे लपवले की त्यांना उघड्या डोळ्यांनी पकडणे कठीण झाले असते. हे २४ कॅरेट ३६९.६७० ग्रॅम सोने दुबईहून मुंबईला पोहचलेल्या फ्लाइटमधून जप्त करण्यात आलं आहे. ज्याची बाजारात किंमत जवळपास १८ लाख ८९ हजार १४ रुपये इतकी आहे. हा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. जो २८ सप्टेंबर रोजी @mumbaicus3 च्या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आला होता.
ट्विटरच्या या कॅप्शनमध्ये म्हटलंय की,२७ सप्टेंबर रोजी दुबईहून आलेल्या पॅक्सच्या बॅगेजच्या स्कॅनिंगदरम्यान मुंबई विमानतळ कस्टम्सने २४ कॅरेट सोने जप्त केले होते. सोन्याचं वजन ३६९.६७० ग्रॅम आहे, ज्याची किंमत १८.८९,०१४ रुपये आहे. हे सोने चॉकलेट-टॉफी आणि शर्टच्या पेपर पॅकिंगच्या दोन लेअरमध्ये लपवून ठेवले होते. आता ही क्लिप सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या माध्यमातून शेअर होत आहे.