पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी मुंबईत आले होते. इथे त्यांनी मेट्रोचे उद्घाटन केले, तसेच विविध 38,800 योजनांचाही शिलान्यास केला. यावेळी बीकेसीला मोठी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला भाजपासोबतच शिंदे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले होते. या संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न एका व्यक्तीने करून मोदींच्या सभेत एनएसजी कमांडो म्हणून घुसण्याचा प्रयत्न केला होता.
नवी मुंबईत राहणारा रामेश्वर मिश्रा असे या घुसखोर तरुणाचे नाव आहे. तो पंतप्रधानांच्या सुरक्षेत बनावट एनएसजी कमांडोचे ओळखपत्र दाखवून घुसण्याचा प्रयत्न करत होता. सुरक्षा रक्षक आणि कमांडोंना संशय आल्याने त्याला ताब्यात घेण्य़ात आले. पोलीस त्याची चौकशी करत आहेत.
मिश्राने तो भारतीय सैन्यात गार्ड्स रेजिमेंटचा जवान असल्याचा दावा केला आहे. यामुळे पीएमओपासून सैन्य, आयबी, दिल्ली पोलिसांसह सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मिश्रा व्हीव्हीआयपी सेक्शनमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होता. तो असे करत होता य़ाची चौकशी केली जात आहे.
पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी 4500 पोलीस तैनात करण्यात आले होते. याशिवाय राज्य राखीव पोलीस दलाच्या चार प्लाटून आणि जलद कृती दलाचे दंगलविरोधी पथकही तैनात होते. वांद्रे कुर्ला परिसर आणि आसपासचा परिसर नो फ्लाय झोन घोषित करण्यात आला होता. तसेच वाहतूकही बंद करण्यात आली होती.