भरुच-
मुंबई पोलीस अँटी नार्कोटिक्स सेलच्या वरळी युनिटनं थेट गुजरातमध्ये जाऊन ड्रग्ज माफियांविरोधात धडक कारवाई केली आहे. गुजरातच्या भरुच जिल्ह्यातील अंकलेश्वर परिसरातील एका ड्रग्ज फॅक्ट्रीचा भांडाफोड पोलिसांनी केला आहे. यासोबतच जवळपास ५१३ किलो एमडी ड्रग्ज जप्त केले आहेत. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत तब्बल १,०२६ कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे.
मुंबई पोलिसांची मोठी कारवाई! नालासोपाऱ्यातून १४०० कोटींचे एमडी ड्रग्ज केले जप्त
छापा टाकण्यात आलेल्या ड्रग्ज फॅक्ट्रीमधून सात जणांना अटक देखील केली गेली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे. राज्यात ड्रग्ज आणि कोकिन माफिया गँग विरोधात मुंबई पोलिसांनी मोठी आघाडी उघडली आहे. गेल्या काही दिवसांत मुंबई पोलिसांनी ड्रग्ज माफियांविरोधात आक्रमक भूमिका घेत कारवाई केली आहे.
मुंबई पोलिसांच्या नार्कोटिक्स विभागाने याच महिन्याच्या सुरुवातीला नालासोपारा शहरातून १,४०० कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले होते. इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आढळून आल्यानंतर नालासोपारा शहरात खळबळ माजली होती. नालासोपारामध्ये याआधी अनेकदा अंमली पदार्थांविरोधात कारवाई झाली आहे. पण पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात पोलिसांना यश आलं होतं. तसंच २६ मे रोजी गुजरातमधील बंदरावरुन पोलिसांनी २६ किलो कोकेन जप्त केले होते. याची किंमत जवळपास ५०० कोटी रुपयांच्या घरात होती. आरोपी ड्रग्जला चक्क मीठ असल्याचं सांगून इराणला घेऊन जात होते. गुप्तचर विभाग आणि पोलिसांच्या नार्कोटिक्स विभागाची ड्रग्ज माफियांवर नजर आहे.