मुंबई : चीन, पाकिस्तान आणि हाँगकाँगमध्ये दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण घेतलेली इंदूर येथील सर्फराज मेमन ही संशयास्पद व्यक्ती सध्या मुंबईत पोहोचली असून, तो घातपाती कारवाया घडवण्याच्या प्रयत्नात असल्याचा संदेश राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीने (एनआयए) ई-मेलद्वारे पाठविल्याने मुंबई पोलिसांसह अन्य यंत्रणांचीही झोप उडाली. त्यानंतर, या सर्फराज मेमनला हुडकून अटक करण्यासाठी विशेष पथकांची नेमणूक करण्यात आली होती. अखेर, सर्फराज मेमनला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
‘डेंजरस मॅन’ या नावाने पाठवलेल्या संदेशात एनआयएने काही तपशीलही तपासयंत्रणांना पुरवला होता. त्यानुसार इंदूरच्या धाररोड परिसरात राहणारा सर्फराज मेमन हा ४१ वर्षांचा असून, त्याच्या पासपोर्टवर २०१८-२०१९ वर्षातील चीनला भेट दिल्याचा शिक्का आहे. त्याच्या पासपोर्टचा अधिक तपशील तपासयंत्रणांकडून गोळा केला जात आहे. दरम्यान, महाराष्ट्र एटीएसच्या पथकाने इंदौर येथून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. सर्फराज याला इंदोरमधून ताब्यात घेण्यात आलं असून, त्याची चौकशी सुरू आहे.
दरम्यान, रविवारी एनआयएला या संदर्भात एक मेल बेनामी ई-मेल आयडीद्वारे आला होता. त्यात या सर्फराज मेमनचा उल्लेख करीत त्याचे आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, लिव्हिंग सर्टिफिकेटचा तपशील जोडण्यात आला होता. ही सारी माहिती एनआयएने सर्व तपास यंत्रणांना पाठवत सर्फराजला रोखण्याच्या सूचना दिल्या आहेत.