मुंबई - आग्रीपाड्यात खासगी कंपनीत सफाई कामगाराची हत्या केल्याप्रकरणी आरोपीला दिल्लीतून ताब्यात घेतले. राजाबाबू असं त्याचं नाव आहे. मोहम्मद शकील उर्फ सय्यद अली (वय २२) याचा खून केल्यानंतर राजाबाबू याने त्याचा मोबाईल चोरून अनेकांना फोन करून तपासात बाधा आणण्याचा प्रयत्न केला होता.
आग्रीपाड्यातील नायर मार्गावरील टोपाझ सहकारी सोसायटीमधील ऑलिव्ह ट्रेड अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. कंपनीत मोहम्मद शकील सफाई कामगार म्हणून कामाला होता. हैदर अब्दुल शाहिद सय्यद यांना मोहम्मद शकील रक्ताच्या थरोळ्यात पडल्याचे आढळून आले. त्यांनी आग्रीपाडा पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी गेलेल्या पोलिसांनी मोहम्मद शकीलला तातडीने नायर रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
किरकोळ वादातून मोहम्मद शकीलच्या हत्या केल्यानंतर राजाबाबूने त्याचा मोबाईल चोरला आणि त्यावरून दोन - तीन जणांना फोन केले. त्यानंतर तो मोबाईल विकून टाकला. त्यामुळे त्या मोबाईलचा मागोवा काढत पोलीस भलत्याच ठिकाणी पोहचतील. अशा प्रकारे गुन्ह्याचा तपास भरकटवण्यासाठी आरोपीने प्रयत्न केला. त्यानंतर आरोपी दिल्लीत फरार झाला. याबाबत आग्रीपाडा पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी आरोपीचा दिल्लीतून ताबा घेतला.