मुंबई- गेल्या काही दिवसांपासून मुंबईत चोरीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. याचपार्श्वभूमीवर मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी सर्वच पोलीस पथकांना कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर ताडदेव पोलीस स्थानकाने एक मोठी कारवाई केली आहे.
कुठेही जाऊन सर्रासपणे मोबाईल, सोनसाखळी चोरणाऱ्या आफ्रिदी शेरूबेग (२५) या अट्टल चोराला ताडदेव पोलिसांनीकर्नाटकातील बिदर या इराणी वस्तीत जाऊन पकडले. पोलिसांना चकवा देऊन तो पळण्याच्या प्रयत्नात होता, मात्र मुसक्या अवळण्यात पोलिसांना अखेर यश आले.
ताडदेवच्या के. के. मार्गावरून एक पादचारी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन चोरांनी त्याच्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढला. याबाबत तक्रार आल्यानंतर ताडदेव पोलीस स्थानकाचे वरिष्ठ निरीक्षक विवेक शेंडे, निरीक्षक गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला.
घटनास्थळावरचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर चोरटा सराईत आरोपी असल्याचे व तो कर्नाटकातील बिदर या इराणी चोरांच्या वस्तीत राहतो असे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी एक विशेष रणनीती आखत बिदर गाठून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. मुंबईत आल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता २ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती ताडदेव पोलिसांनी दिली.