मुंबई - मागील काही महिन्यांपासून ड्रग्समुक्त महाराष्ट्रसाठी मुंबई पोलिसांनी मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेत पोलिसांना मोठे यश आले आहे. दोन वर्षे जुन्या प्रकरणाच्या संदर्भात आंतरराज्यीय ड्रग सिंडिकेटचा माफिया आणि त्याच्या साथीदाराला मुंबई पोलिसांनी ओडिशातून अटक केली आहे. या दोघांना ३.८५ कोटी रुपयांच्या तब्बल १८०० किलो गांजा जप्ती प्रकरणी अटक केली आहे असं एका अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले.
मुंबई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी सेलने (ANC) कथित किंगपिन लक्ष्मीकांत उर्फ लक्ष्मीभाई प्रधान आणि त्याचा साथीदार बिद्याधर प्रधान जे दोघेही फरार होते. या दोघांवर आणखीही बरेच काही गुन्हे आहेत. शनिवारी ओडिशाच्या गंजम जिल्ह्यातील गोलांथरा येथून अटक करण्यात आली. पोलिसांनी आतापर्यंत अंमली पदार्थ जप्त केल्याप्रकरणी पाच जणांना अटक केली आहे.
या अटकेचा संबंध आंतरराज्यीय ड्रग रॅकेटशी जोडला गेला आहे. जिथे २०२१ मध्ये ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर विक्रोळी येथे १८०० किलोग्राम गांजा जप्त करण्यात आला होता. फेब्रुवारी २०२१ मध्ये पोलिसांना खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनंतर विक्रोळी हायवेवर एक ट्रक अडवला. त्यात साडे तीन कोटींचा गांजा होता. यावेळी ३ संशयितांना अटक झाली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. आता याच प्रकरणात लक्ष्मीकांत प्रधान आणि विद्याधर प्रधानला अटक केली असून हे दोन्ही आरोपी मूळचे ओडिशातील कंधमाल जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
गेली २ वर्ष हे दोघे तेलंगणा, हैदराबाद आणि नेपाळमध्ये लपून बसले होते. अलीकडेच घाटकोपरच्या अंमली पदार्थ पोलीस युनिटने ९ डिसेंबरला ओडिशातील ब्रह्मपूर जिल्ह्यात दोघांना अटक केली. त्यांना न्यायालयाने २० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. लक्ष्मीकांतवर मुंबईतील नवघर पोलीस ठाण्यात अंमली पदार्थाच्या गुन्ह्याव्यतिरिक्त ओडिशात खून, खूनाचा प्रयत्न, अपहरण यासारखे ४ गुन्हे दाखल आहेत. तर बिद्याधरही इतर ३ गंभीर गुन्हे आहेत. हे आरोपी गेल्या अनेक वर्षापासून अंमली पदार्थाचा पुरवठा करत होते. ओडिशा आंध्र प्रदेश सीमेवरून ट्रकनं मुंबईत दारू आणि अंमली पदार्थ आणत होते.