मनीषा म्हात्रेमुंबई : अभिनेता सुशांतसिंह मृत्यूनंतर सुरू झालेल्या ड्रग्ज विक्री आणि तस्करीच्या एनसीबीच्या तपासात फक्त बॉलिवूड सेलिब्रिटीच नाही तर उद्योगपतींसह राजकारणातील व्यक्तींची नावे समोर आली. अशात, क्रूझवरील कारवाईमुळे अनेकांची धडधड पुन्हा वाढली आहे. गेल्या काही महिन्यांपासून एनसीबीने मुंबईमध्ये अनेक कारवाया केल्या आहेत. एनसीबीने नुकतेच कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याचे ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त करत डोेंगरीतील ड्रग्ज बनविणाऱ्या कारखान्यावर कारवाई केली. यात माफिया डॉन करीम लाला याचा नातेवाईक परवेझ खान ऊर्फ चिंकू पठाण याला गजाआड केले.
सुशांतसिंह मृत्यूप्रकरणात अमली पदार्थांचा सहभाग समाेर आल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करून एनसीबीने तपास सुरू केला. एनसीबीने सुरुवातीला सुशांतसिंगच्या संबंधित प्रकरणाचा तपास करत बॉलिवूड सेलिब्रिटी आणि उच्चभ्रू ग्राहकांना अंमली विकणाऱ्याची धरपकड सुरू केली. अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक यांच्यासह एकूण ३३ जणांवर आरोपपत्र दाखल केले. तर मालाड येथील बेकरीमधून केक, पेस्ट्रीच्या माध्यमांतून हाईप्रोफाइल सोसायट्यामध्ये ड्रग्ज विक्री होत असल्याचा प्रकार एनसीबीने समोर आणला. तर ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने अभिनेत्री दीपिका पादुकोन हिच्यासह सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह आणि फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटा यांच्याकडे चौकशी केली. क्वान कंपनीची टॅलेंट मॅनेजर जया शाह आणि ड्रग्ज पेडलर अनूज केशवानी यांच्या चौकशीत श्रद्धा, सारासह रकुल यांची नावे समोर आली.
मुच्छड पानवालालाही केली अटकएनसीबीने ब्रिटिश नागरिक करण सजनानी याच्यासह बॉलिवूडमधील एका सेलिब्रिटीची माजी मॅनेजर राहिला फर्निचरवाला आणि तिची बहीण सैष्ठा यांना अटक केली. करन सजनानी याच्या चौकशीत मोठा हायप्रोफाईल ग्राहकवर्ग असलेल्या मुच्छड पानवालाचे नाव समोर आले. त्याच्या पान दुकानात ओजी कुश (गांजाच्या एक तण) आयात करण्यात येत असल्याची कबुली सजनानीने दिली. पानवाला त्याचा वापर ठराविक ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या पानातून करीत होता. त्यामुळे एनसीबीने त्याला अटक केली. टीव्ही अभिनेता गौरव दीक्षितही एनसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. तर दुसरीकडे अभिनेता अरमान कोहली याच्या घरातही एनसीबीने छापा टाकत कोकेनचा साठा जप्त केला. त्यालाही अटक केली आहे.
कोकेन : नायजेरियनकडून मोठ्या प्रमाणात कोकेनची तस्करी होत असून, मीरारोड, नालासोपारा, खारघर, उलवे, चकाला, अंधेरी, मीनारा मस्जीद, मोहम्मद अली रोड वांद्रे येथून त्याचा पुरवठा होतो.
एलसीडी : यूरोपीय देशातून तस्करी होणारे हे ड्रग्ज गोरेगाव, मालाड, अंधेरी/लोखंडवाला येथून पुरवले जातात.
हेरॉईन : अफगानिस्तान येथून इरान व्हाया न्हावा-शेवा मार्गे हे ड्रग्ज मुंबईत येते. धारावी, कुर्ला, मुंबई सेंट्रल येथून याचा पुरवठा होत आहे.
चरस : हिमाचल, जम्मू काश्मीर आणि नेपाळ भागातून येणारे चरसचे मुंबईत कुर्ला बैल बाजार, वर्सोवा, प्रतीक्षा नगर, किंग सर्कल, अंधेरी, डोंगरी, भायखळा, ठाणे येथे सप्लाय सेंटर आहेत.
मेफेड्रोन : रासायनिक कारखान्यातून तयार होणारे एमडी हे कॉलेज परिसरासह वर्सोवा, कुर्ला, वसई, अंधेरी, लोखंडवाला, डोंगरी, मीरारोड, नालासोपारा, वांद्रे येथून पुरवले जाते.
गांजा : आंध्रप्रदेश, ओडिशात तयार होणारा गांजा ठाण्यातील उत्तन मार्गे मुंबईत पुरवठा केला जातो. तर धुळे, जळगाव, शिरपूर, उत्तन भागात याची अवैध पद्धतीने शेती केली जाते.
एनसीबीने करण जोहरची कंपनी धर्मा प्रोडक्शनचे एक्झिक्यूटिव्ह प्रोड्यूसर क्षितीज प्रसाद आणि सहायक दिग्दर्शक अनुभव चोपडाची चौकशी केली. पुढे प्रसाद यांना अटक केली. तर कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिम्बाचिया यांनाही ड्रग्ज प्रकरणात जेलची हवा खावी लागली. तसेच राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांनाही एनसीबीने अटक केली होती. त्यानंतर त्यांना जामीन मिळाला आहे.