मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या आरोपामुळे गेल्या तीन दिवसांपासून चर्चेत राहिलेल्या कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टीवर एनसीबीच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित होत आहे. केलेली सर्व कारवाई कायदेशीर असल्याचा दावा एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंग यांनी केला. मात्र, त्याबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचे त्यांनी टाळले. भाजपचे पदाधिकारी मनीष भानुशाली(Manish Bhanushali) व किरण गोसावी(Kiran Gosavi) हे इतरांप्रमाणे साक्षीदार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक(Nawab Malik) यांनी केलेल्या आरोपानंतर एनसीबीने सायंकाळी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला विभागीय संचालक समीर वानखेडे उपस्थित होते. यावेळी ज्ञानेश्वर सिंग म्हणाले, ‘कोरोना नियमाचे पालन करून कारवाई करण्यात आली आहे. छाप्याच्या वेळी आर्यन खानजवळ ड्रग्ज सापडले होते. त्यामुळे आमच्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. या प्रकरणात मनीष भानुशालीकडून माहिती मिळाली होती. त्याच्यासह किरण गोसावी, प्रभाकर साईल, ऑब्रे गोमेझ, आदिल उस्मानी, व्ही. वायगणकर, अपर्णा राणे, प्रकाश बहादूर, शोएब फैज व मुझम्मिल इब्राहिम हे स्वतंत्र साक्षीदार आहेत. त्यांचा एनसीबीशी काही संबंध नाही.’
क्रूझवरील कारवाईवेळी भानुशाली हा एखाद्या अधिकाऱ्याप्रमाणे आर्यन खान(Aryan Khan Arrested), अरबाज मर्चंट यांना पकडून नेत असल्याचे उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज व व्हिडिओतून स्पष्ट झाले आहे. माहीतगार तसेच साक्षीदाराला असे अधिकार आहेत का, असा प्रश्न विचारला असता एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी काहीही उत्तर न देता पत्रकार परिषद संपविली.
या प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या मनीष भानुशाली यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. ‘माझ्याकडे आता पक्षाचे कोणतेही पद नाही. मला क्रूझवर होणाऱ्या ड्रग्ज पार्टीबद्दल माहिती मिळाली ती मी एनसीबीच्या अधिकाऱ्यांना कळविली होती. त्याशिवाय माझा काही संबंध नाही', असे भानुशाली यांनी म्हटले आहे.