मुंबई – आर्यन खान निगडीत ड्रग्ज(Drugs) प्रकरणात(Aryan Khan) तपास करणाऱ्या NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. बॉलिवूड कलाकारांमध्ये दहशत पसरवून त्यांच्याकडून कोट्यवधी वसूल केले जातात असा दावा करण्यात येत आहे. या प्रकरणातील साक्षीदार पलटल्याने समीर वानखेडे (Sameer Wankhede) चांगलेच अडचणीत आले आहेत. आर्यनला सोडण्यासाठी २५ कोटींची डील होणार होती. त्यातील ८ कोटी वानखेडेंना मिळणार असल्याचा गंभीर आरोप पंच साक्षीदार प्रभाकर साईलनं केला आहे.
NCB नं या प्रकरणात फरार आरोपी किरण गोसावी(Kiran Gosavi) याला स्वतंत्र साक्षीदार बनवल्यानं वाद निर्माण झाला. किरण गोसावी सध्या फरार असून त्याला मुंबईत येण्याची भीती वाटतेय. यूपीत सरेंडर करणार असल्याचं म्हटलं. सूत्रांच्या माहितीनुसार किरण गोसावी महाराष्ट्राच्या सीमेत दाखल झाला आहे. मडियावा पोलीस ठाण्याबाहेर बंदोबस्त आहे परंतु आतापर्यंत गोसावीने सरेंडर केले नाही.
किरण गोसावी आणि प्रभाकर साईलचे व्हॉट्सअप चॅट समोर
एनसीबी तपासातील फरार पंच किरण गोसावी आणि समीर वानखेडे यांचे काही फोटो समोर आले आहेत. यात फोटोत काही लोकांमध्ये समीर वानखेडे खुर्चीत बसलेले दिसतात. तर त्यांच्यामागे किरण गोसावी आणि मनीष दिसून येतो. हा फोटो क्रुझवरील आहे. म्हणजे एनसीबीने छापा टाकला होता तेव्हा ते दोघंही तिथे हजर होते. किरण आणि प्रभाकर यांच्यातील Whatsapp चॅटदेखील समोर आलं आहे जे ३ ऑक्टोबरचं आहे. त्यात किरण गोसावीनं साईलला सूचना केल्या होत्या. बाहेरुन दरवाजा लाव आणि चावी खिडकीच्या बाहेर फेकून दे असं गोसावीने सांगितले होते.
नवाब मलिकांचे आरोप
मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) यांनी समीर वानखेडेंवर आरोप केलेत की, त्यांचे वडील दलित आणि आई मुस्लीम होती. त्यांच्या वडिलांनी आईचा मुस्लीम धर्म स्वीकारला आहे. परंतु समीर वानखेडेने अनुसुचित जातीचं बनावट जात प्रमाणपत्र सादर करत नोकरी मिळवली आणि गरीबाचा हक्क डावलला. NCB च्या ताब्यात असताना गोसावीने आर्यन खानसोबत सेल्फी घेतल्यानं वाद झाला. हा माणूस NCB चा नाही तर तो छापेमारीवेळी काय करत होता? असा प्रश्न मलिकांनी उपस्थित केला.
कोण आहे किरण गोसावी?
किरण गोसावी याच्याविरोधात पुणे पोलिसांनी लुकआऊट नोटीस जारी केली आहे. गोसावीविरुद्ध पुण्यात २०१८ मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून मलेशियात नोकरी देतो म्हणून युवकाकडून ३ लाख रुपये हडपले होते. याच प्रकरणात २९ मे २०१८ रोजी त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. हा गुन्हा नोंद झाल्यापासून किरण गोसावी फरार आहे.