मुंबई - हिमालय पूल दुर्घटनेचे तीव्र पडसाद उमटताच पालिका प्रशासनाने तत्काळ स्ट्रक्चरल आॅडिटर, ठेकेदार व पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई केली. त्यातच आज आझाद मैदान पोलिसांनी स्ट्रक्चरल ऑडिटर नीरजकुमार देसाईला चुकीचा अहवाल दिल्याचा ठपका ठेवत अटक करण्यात आली. त्याचप्रमाणे पोलिसांच्या रडारवर या पुलाचे मुख्य अभियंता संजय दराडे हे आहेत अशी माहिती टाइम्स नाऊ न्यूज यांनी माहिती दिली आहे.
आझाद मैदान पोलिसांनी घटनेच्या दिवशीच रात्री उशिरा पुन्हा दाखल केला. त्यानंतर संजय दराडे यांचा पोलिसांनी जबाब नोंदविला असून पुन्हा त्यांना चौकशीसाठी बोलाविले जाऊ शकते अशी माहिती पोलीस सूत्रांनी टाइम्स नाऊ न्यूजला दिली आहे. गेल्या गुरुवारी छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाला जोडणारा पूल कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला, तर ३१ जखमी झाले आहेत. या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीनंतर पूल विभागाच्या दोन निवृत्त अधिकाऱ्यांची सखोल चौकशी तर दोन अधिकाऱ्यांचे निलंबन व एका अधिकाऱ्याची चौकशी करण्यात येणार आहे. तसेच स्ट्रक्चरल आॅडिटर डी. डी. देसाई असोसिएट आणि ठेकेदार आर.पी.एस इन्फ्रास्ट्रक्चरला नोटीस बजावून काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू आहे.
२०१३ मध्ये या पुलाची दुरुस्ती करणाऱ्या आरपीएस इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला महापालिकेने यापूर्वीच रस्ते घोटाळा प्रकरणात काळ्या यादीत टाकले आहे. त्यामुळे या कंपनीला पुन्हा काळ्या यादीत टाकण्याच्या कारवाईबाबत नगरसेवकांनी भुवया उंचावल्या आहेत. स्ट्रक्चरल आॅडिटर डी.डी. देसाई असोसिएट्स व ठेकेदार आरपीएस या दोघांनाही कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. त्यानंतर चौकशी अहवालात केलेल्या शिफारशीनुसार त्यांच्यावर कारवाई होणार आहे. यामध्ये काळ्या यादीत टाकणे, उर्वरित कामाचे पेमेंट न करणे, केलेले पेमेंट वसूल करणे, पॅनलवरून काढणे अशा कारवाईचा समावेश आहे.