Aryan Khan Drugs Case: अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात कारवाईवेळी उपस्थित असलेला पंच प्रभाकर साईल याच्या धक्कादायक गौप्यस्फोटानंतर संपूर्ण प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. आर्यन खानला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्यासोबत सेल्फी टिपणारा किरण गोसावी याचा बॉडीगार्ड असल्याचा दावा प्रभाकर साईल केला आहे. त्यामुळे फरार असलेल्या किरण गोसावीचं नाव आता पुन्हा एकदा याप्रकरणात पुढे आलं आहे. यातच गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेल्या किरण गोसावीनं आता समोर येत संपूर्ण प्रकरणात काही खुलासे केले आहेत.
प्रभाकर साईल यानं संपूर्ण प्रकरणात कारवाईनंतर एनसीबीनं कोऱ्या कागदावर जबरदस्तीनं सह्या घेतल्या. इतकंच नव्हे, तर आर्यन खानला सोडण्यासाठी २५ कोटीचं डील झाल्याचं सॅम डिसोझा आणि किरण गोसावी यांच्यात बोलणं सुरू होतं. यात समीर वानखेडे यांना ८ कोटी द्यायचे आहेत, असं बोलणं ऐकल्याचं प्रभाकर साईल यानं म्हटलं आहे. साईल याच्या गौप्यस्फोटानंतर एनसीबीसमोर अडचणी वाढताना दिसत आहेत.
किरण गोसावी अखेर समोरप्रभाकरनं केलेल्या आरोपांनंतर आता किरण गोसावी माध्यमांसमोर आला आहे. किरण गोसावीनं यानं 'आजतक' या वृत्तवाहिनीला फोनवरुन मुलाखत दिली आहे. यात त्यानं अनेक खुलासे केले आहेत. समीर वानखेडे यांना अजिबात ओळखत नसल्याचा दावा किरण गोसावी यानं केला आहे.
आर्यन खानसोबत एनसीबीच्या कार्यालयात चर्चा सुरू असल्याच्या व्हिडिओबाबत विचारण्यात आलं असता किरण गोसावी यानं आर्यन खान यानंच आपल्या कुटुंबीयांशी फोनवर बोलणं करुन द्या अशी विनंती केली होती असं सांगितलं. "आर्यन खान स्वत: माझ्याकडे कुटुंबीयांना किंवा त्याच्या मॅनेजरला फोन करण्याची विनंती करत होता. त्यामुळे मी त्याची मॅनेजर पूजा यांना फोन लावून दिला. पण समोरुन फोन उचलला गेला नाही", असं किरण गोसावी म्हणाला.
नेमकं काय म्हणाला किरण गोसावी?"मी ६ ऑक्टोबरपर्यंत मुंबईतच होतो. पण मला नाईलाजानं माझा फोन बंद करावा लागला. कारण मला धमकीचे फोन येणं सुरू झालं होतं. माझ्या जीवाला धोका आहे. मी समीर वानखेडे यांना ओळखत नाही. त्यांना तर मी फक्त टेलिव्हिजनवर पाहिलं आहे. एनसीबीच्या याआधीच्या कोणत्याही छाप्यांमध्ये माझा सहभाग कधीच नव्हता. त्यादिवशी क्रूझवरील छाप्यावेळी मी फक्त तेथे उपस्थित होतो", असं किरण गोसावी यानं सांगितलं.
"एनसीबीनं पंचनामा करुन त्यावर माझी सही घेतली. मी पंचनामा वाचूनच सही केली होती. त्यानंतर एनसीबीच्या कार्यालयातही माझी साक्षीदार म्हणून सही घेण्यात आली. आर्यन खान माझ्या बाजूलाच बसला होता. त्यानं माझ्याकडे घरच्यांशी बोलणं करुन देण्याची विनंती केली. कारण त्यावेळी त्याचा मोबाईल त्याच्याकडे नव्हता. माझा फोन माझ्याजवळच होता. माझ्या आई-वडीलांशी किंवा मॅनेजरशी माझं बोलणं करुन द्या असं त्यानं मला सांगितलं. म्हणून मी फोन लावून दिला. पण फोन त्यावेळी समोरुन उचलला गेला नाही", असं किरण गोसावी यानं स्पष्ट केलं.
प्रभाकर साईल याला ओळखत असल्याचंही केलं मान्य"मी प्रभाकरला ओळखतो. तो माझ्यासाठी काम करत होता. पण त्यानं केलेल्या आरोपांची मला कोणतीही माहिती नाही. ११ ऑक्टोबरपासून मी त्याच्या संपर्कात नाही", असं किरण गोसावी यानं सांगितलं. पुण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याबाबत विचारलं असता गोसावीनं त्याचीही कबुली दिली आहे. "माझ्या विरोधात पुण्यात एका जुन्या प्रकरणात नोंद आहे. पण अचानक आता जुन्या केसवरही काम सुरू झालं आहे. माझा शोध घेण्यासाठीची नोटीस जारी करण्यात आली आहे. माझ्या जीवाला धोका आहे. मला तुरुंगात ठार केलं जाईल अशी धमकी मला दिली गेली आहे आणि मला आलेल्या धमकीच्या फोन कॉल्सचे सर्व डिटेल्स माझ्याकडे आहेत. आता तुम्हीच विचार करा मी सुरक्षित आहे की नाही?", असं किरण गोसावी म्हणाला.