मुंबई - अंधेरी येथील मरोळ परिसरातील विजय नगरमध्ये राहणाऱ्या १९ वर्षीय झीनत हक या मुलीने स्वतः चा चोरलेल्या मोबाईल चोराचा पर्दापाश केला आहे. पोलिसानांप्रमाणे तपास करत तिने तंत्रज्ञानाचा वापर करून चोराच्या मुसक्या अवघ्या २४ तासात आवळल्या आहेत. दादर रेल्वेपोलिसांना तिने पॉंन्डिचेरी एक्प्रेसने प्रवास करणाऱ्या आरोपीला ६ ऑगस्टला बेड्या ठोकण्यास मदत केली आहे. या आरोपीचे नाव सिल्वराम रतन शेट्टी (वय - ३२) असं आहे.
अंधेरी पूर्वेकडे असलेल्या वंडर किड्स येथे काम करत असून तिचा प्रवासादरम्यान दादर येथून ५ ऑगस्टला रात्री १० वाजताच्या सुमारास मोबाईल हरवला. शिओमीचा रेडमी ४ हा मोबाईल होता. नंतर रात्री घरी गेल्यावर झीनतने जेम्स बॉण्ड बनत तंत्रज्ञानाचा वापर करून गुगल अकाउंट तपासून पहिले. तेव्हा चोरट्याने मोबाईलमधील माझे जीमेल अकाउंट डिलीट न करता वापरत असल्याने त्याचे लोकेशन शोधणं सोयीचं झालं. मला रात्री १०.२३ वाजता मालाड येथील डीमार्टचे लोकेशन तिला सापडले. दुसऱ्या दिवशी म्हणजेच ६ ऑगस्टला मालाडचे लोकेशन ट्रेस झाले होते. दरम्यान, मी गुगल ऍक्टिव्हिटी तपासली असता आरोपीने व्हाट्स ऍप, फेसबुक वापरत असल्याचे दिसून आले. तसेच त्याने अभिनेता रजनीकांतच्या काला चित्रपटातील गाणं देखील सर्च केल्याचे ऍक्टिव्हिटीमध्ये दिसले असल्याची माहिती तक्रारदार झीनतने 'लोकमत'शी बोलताना दिली. त्याचप्रमाणे अत्यंत महत्वाची माहिती समोर आली ती म्हणजे आरोपीने रेल्वे तिकीट बुक करण्याचे ऍप डाउनलोड करून पॉंन्डिचेरी एक्प्रेसचे ६ ऑगस्टचे रात्री ९. ३० वाजताचे दादर ते तिरुवण्णामलई असे तिकीट बुक केल्याची माहिती तिला मिळाली. या माहितीचा लगेच फोटो मी काढला आणि सायंकाळी दादर रेल्वे पोलिसांना भेटली अशी माहिती पुढे झीनतने दिली. त्यावेळी दादर रेल्वे पोलिसांनी मला खूप सहकार्य केले आणि आरोपी एक्प्रेस ट्रेनकडे येण्याआधीच मी आणि पोलीस पोचलो. संबंधित स्लीपर डब्याकडे पोहचल्यावर मी माझा मोबाईल ओळखला आणि ज्या व्यक्तीच्या हातात हा मोबाईल आढळला त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पहिल्यांदा पोलिसांना आरोपी मी मोबाईल त्याला विकला, दुसऱ्यांदा माझ्या बहिणीने दिला अश्या सबबी सांगू लागला. नंतर पोलिसांना संशय आल्याने त्यांनी शेट्टीला ताब्यात घेतले अशी सर्व हकीकत झीनतने 'लोकमत'शी बोलताना सांगितली.