म्हापसा - कळंगुट परिसरातील एका नामांकित हॉटेलात झालेल्या वादाचा बदला घेण्यासाठी हॉटेलात बॉम्ब असल्याचा बनावट कॉल पोलीस नियंत्रण कक्षाला करुन त्यांची तारांबळ उडवणाऱ्या मुंबईतील मालाड येथील एका युवतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रंगोली परेश पटेल ही २३ वर्षीय युवती मुंबईतील मालाड (पश्चिम) भागातील असून तिच्यावर गुन्हा नोंद करुन तिला अटक करण्यात आली आहे. युवतीने वापरलेला फोनही ताब्यात घेण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सीताराम मळीक आणि पोलीस निरिक्षक जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.
हा भयानक प्रकार आज दुपारी सव्वाएकच्या सुमाराला कळंगुट परिसरात घडला. पोलीस निरिक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कळंगुट भागातील एका प्रसिद्ध हॉटेलात बॉम्ब असल्याची माहिती नियंत्रण कक्षाला देण्यात आली. लागलीच पोलिसांनी हालचाली करुन संबंधित हॉटेलात बीडीडीएस पथक, दहशतवादी विरोधी पथक आणि श्वान पथकासह दाखल झाले. पोलिसांनी हॉटेल खाली करण्याची सूचना तेथील व्यवस्थापनाला देण्यात आली. दाखल झालेल्या सर्व पथकांनी हॉटेलची तपासणी सुरु केली. सुमारे दोन तासाच्या तपासणीनंतर हॉटेलात बॉम्ब ठेवल्यासंबंधी करण्यात आलेला फोन बनावट (हॉक्स) असल्याचे आढळून आले.
हॉटेलची तपासणी सुरु असताना दुसरीकडे बनावट फोन करणाऱ्या त्या युवतीचा शोधही सुरु करण्यात आला. परिसरातील सर्व हॉटेलची तपासणी केली असता त्याच हॉटेलाला लागून असलेल्या दुसऱ्या हॉटेलात ती युवती आपल्या मैत्रिणीसोबत वास्तव्य करुन असल्याचे आढळून आले. अधिक चौकशीसाठी त्या मुलीला पोलीस स्थानकात आणण्यात आले. त्यावेळी केलेल्या चौकशीदरम्यान आपणच फोन केल्याची कबुली त्या युवतीने पोलिसांना दिली. संबंधित हॉटेलातील वेटरसोबत झालेल्या वादाचा बदला घेण्यासाठी व त्या हॉटेलची बदनामी व्हावी व त्यांची नुकसानी व्हावी या हेतूने हे कृत्य केल्याची कबूली चौकशी दरम्यान दिली.