कोल्हापूर - येथील लक्ष्मी गोल्ड बुलियन या कंपनीचे तीन किलो सोने, अडीच कोटी रोकड व व एक महागडी कार असा तीन कोटी रुपयांचा मुंबईहून आलेला हवालाचा मुद्देमाल लुटण्याची टिप मालकाच्या कार चालकानेच दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. चालक झुंबऱ्या उर्फ राजु बळीराम कदम त्याचे साथीदार भावड्या उर्फ संतोष ईश्वर मोरे, सोमनाथ यल्लाप्पा माने (तिघे रा. दिघंची, ता. आटपाडी, जि. सांगली) यांची नावे निष्पन्न झाली आहेत. यापूर्वी पाच जणांना अटक केली आहेत. गुन्ह्यात एकूण आठ आरोपींचा सहभाग असून झुंबऱ्यासह तिघांना लवकरचं अटक केली जाईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत शनिवारी दिली. मुंबईहून आलेला १ कोटी १८ लाख रुपयांच्या हवालाच्या मुद्देमालाची लुटमार १४ जूनला झाली होती. याप्रकरणी पोलीसांनी संशयित लक्ष्मण अंकुश पवार (रा. खटके वस्ती, लिंगीवरे, ता. आटपाडी, जि. सांगली), गुंडाप्पा तानाजी नंदीवाले (रा. तमदलगे, ता. हातकणंगले), अविनाश बजरंग मोटे (रा. शिवाजी चौक, हातकणंगले), अक्षय लक्ष्मण मोहिते (रा. आंबेडकरनगर, हातकणंगले), इंद्रजित बापू देसाई (रा. हातकणंगले) यांना अटक केली. त्यांच्याकडून ३२ लाखांची रोकड, ३० लाखांची सोन्याची बिस्किटे, कार व दुचाकी असा सुमारे ६७ लाख किंमतीची मुद्देमाल जप्त केला होता. सात दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये त्यांनी कट रचून लुटमार केल्याचे निष्पन्न झाले.