मुंबई : महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याबरोबर अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना अन्य विभागांच्या बनावट ओळखपत्रांच्या आधारे लोकलने प्रवास करणाऱ्यांवर आतापर्यंत २ हजार १०० जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यात, मोलकरणीपासून व्यापारी वर्गाचाही समावेश आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सर्वासाठी अद्याप लोकल सेवा सुरू करण्यात आलेली नाही. त्यात ओळखपत्र आणि क्यूआर कोडच्या पासवर लोकलने प्रवास करण्याची मुभा दिली. त्यात अन्य वाहनांचा खर्च परवडणारा नसल्याने अनेक जण थेट बनावट ओळखपत्राच्या आधारे प्रवास करत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने कारवाईचा वेगही वाढवला आहे. उपनगरीय मार्गावर बुधवारी दिवसभरात ३८६ जणांवर कारवाई करुन त्यांच्याकडून १ लाख ७ हजार ५३० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. १५ आक्टाेबरपर्यत २ हजार ९४३ विना तिकीट आणि बनावट ओळखपत्र बाळगणाऱ्या प्रवाशांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईतून ११ लाख ७२ हजार २८० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.