मुंबई - अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद खटल्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि उपनगरांमध्ये कलम १४४ अन्वये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मुंबई शहरात गेल्या काही दिवसांपासून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आज, शनिवार सकाळी ११ वाजल्यापासून ते उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत मुंबईत जमावबंदीचे आदेश मुंबई पोलिसांनी लागू केले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रणव अशोक यांनी लोकमतशी बोलताना दिली.
अयोध्या खटल्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह उपनगरांमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे. कलम १४४ अन्वये लागू करण्यात आलेल्या जमावबंदीच्या आदेशानुसार एका ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. सकाळी ११ वाजल्यापासून हा जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. सुव्यवस्थेला बाधा पोचू नये यासाठी शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. खबरदारी म्हणून पोलिसांच्या सायबर सेलने सोशल नेटवर्किंग साइट्सवर करडी नजर ठेवली आहे. कुणीही अफवा पसरवण्यात येऊ नयेत, असं आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे.