सध्या सायबर फ्रॉडचं प्रमाण खूप वाढलं आहे. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. मुंबईतील एका खासगी कंपनीत अकाउंटंट म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीसोबत भयंकर प्रकार घडला आहे. या व्यक्तीने तब्बल 1.08 कोटी रुपयांवर डल्ला मारल्याचा आरोप करण्यात आला आहे.
व्यक्तीने हे सर्व पैसे एका इन्श्योरन्स स्कीममध्ये गुंतवले. हे सर्व पैसे त्याने स्वतःच्या नावाने गुंतवले होते. पण प्रत्यक्षात ही गुंतवणूक नसून सायबर फ्रॉड असल्याचं त्याला माहीतच नव्हतं.
1992 पासून ही व्यक्ती एका खासगी कंपनीत काम करत होती. त्याच्यावर 1.08 कोटी रुपयांवर डल्ला मारल्याचा आरोप आहे. मात्र त्यानंतर तो स्वत: सायबर फसवणुकीचा बळी ठरला.
जवळपास तीन दशक कंपनीत काम करणाऱ्या या व्यक्तीने कंपनीचे मालक आणि संचालक मंडळाचा विश्वास जिंकला होता. यानंतर त्याला बँकिंग व्यवहारांसाठी ओटीपीची अथॉरिटी मिळाली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अकाउंटंट म्हणून काम करणाऱ्या आरोपीने वेगवेगळ्या व्यवहारातून कंपनीच्या बँक अकाऊंटमधून तब्बल 1.08 कोटी रुपये काढले होते.
फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्टमध्ये कंपनीच्या चार्टर्ड अकाउंटंटने 1.08 कोटी रुपयांचा फ्रॉड झाल्याचं उघड झालं आहे. 2016 ते 2023 दरम्यान ही फसवणूक झाली.
अटक केलेल्या व्यक्तीने आपला आरोप कबूल केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याने असेही सांगितले की 2021 मध्ये त्याला चार लोकांचे कॉल आले ज्यांनी दावा केला की ते त्याचे पैसे दुप्पट करतील. यानंतर त्यांनी कंपनीचे पैसे त्यात गुंतवले. आरोपींनी वेगवेगळ्या पेमेंट्सच्या नावावर ही रक्कम काढली, ज्यामध्ये आयकर आणि जीएसटीचा समावेश आहे.