Mumbai MD Drugs Case | अंबरनाथ: मुंबईत पकडलेल्या कोट्यावधी रुपयांच्या एमडी ड्रग्स प्रकरणात अंबरनाथचे नाव देखील पुढे येऊ लागले आहे. या ड्रग्सचे अंबरनाथ मधील आनंद नगर एमआयडीसी असलेल्या एका कंपनीशी थेट कनेक्शन असल्याचा संशय आहे. त्याच आधारावर आज मुंबईच्या नारकोटिक्स डिपार्टमेंटने आनंद नगर मधील कंपनीवर धाड टाकून त्या ठिकाणी तपास सुरू केला आहे.
वरळीत पकडलेल्या कोट्यवधी रुपयांच्या एम डी ड्रग्सचे अंबरनाथ कनेक्शन असण्याची शक्यता असून अंबरनाथमध्ये एमडी ड्रग्ज तयार केले जात असल्याची शक्यता नार्कोटिक्स विभागाने व्यक्त केली आहे. त्याच शक्यतेच्या आधारावर आज नारकोटिक्स विभागातील पंधरा ते वीस जणांच्या पथकाने अंबरनाथ आनंद नगर एमआयडीसीत असलेल्या नमाऊ केम कंपनीवर धाड टाकली. नार्कोटिक्स विभागाची टीम कंपनीत रात्री उशिरापर्यंत तपास करीत होते.
हा तपास मुंबईत पकडण्यात आलेल्या एमडी ड्रग्स प्रकरणात असल्याचे सांगण्यात आले असले तरी याबाबत अधिक माहिती देण्यास नारकोटिक्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे. या कंपनीत काम करणारे काही कर्मचारी आणि उच्च अधिकारी या रॅकेटमध्ये सहभागी असण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे.