जमीर काझीमुंबई - बनावट कागदपत्राच्या सहाय्याने येथील बॅँकेला तब्बल सहा कोटीला गंडा घातलेल्या एका ठकसेनाला पकडण्यासाठी मध्यप्रदेशला गेलेले मुंबई पोलिसांचे पथक तब्बल आठ दिवसापासून अडकून पडले आहे. कसलाही गंभीर अजार नसताना फसवणूक करणाऱ्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांना ‘मॅनेज’करीत तो स्थानिक रुग्णालयात दाखल झाला आहे.वैद्यकीय अहवालात कोणतीही गंभीर बाब नमूद नसताना विविध वैद्यकीय चाचण्या करण्याच्या निमित्याने त्याचा मुक्काम वाढविला जात असल्याने तपास अधिकारी वैतागून गेले आहेत.‘ट्रान्झिट रिमांड’मिळत नाही. राजू लोचन जानकराज सोनी (वय ६२) असे या आरोपीचे नाव असून त्याने येथील एचएसबीसी बॅँकेला खोट्या कागदपत्राच्या आधारे ६ कोटीचे कर्ज उचलले होते. मात्र त्याची परतफेड न केल्याने त्याच्याविरुद्ध तीन वर्षापूर्वी बॅँकेने आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार दिली आहे.हॉगकॉंग-शिलॉँग (एचएसबीसी) बॅँकेचे मुंबईत सीएसएमटी परिसरात मुख्य कार्यालय आहे. मेटलमेन इंडस्ट्रिज प्रायव्हेट कंपनीचा चालक असलेला जानकराज सोनी याचे अंधेरीत कार्यालय होते. व्यवसायाच्या निमित्याने त्याने बॅँकेतून कर्ज घेतले होते. मात्र परतफेड न केल्याने याप्रकरणी एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून आर्थिक गुन्हा शाखा तपास करीत आहे. इंदोरमधील मनोरमा गंज येथे रहात असलेल्या सोनी ३ वर्षापासून देशभरात विविध ठिकाणी वास्तव्य करीत पोलिसांना चकवा देत होता. इंदोरमधील निवासस्थानी आला असल्याची पक्की माहिती मिळाल्यानंतर एका निरीक्षकाच्या नेतृत्वाखाली तीन अधिकाºयांचे पथक सात फेबु्रवारीला तिकडे रवाना झाले. आठ तारखेला त्याच्या तीन मजली कार्यालयावर स्थानिक पोलिसांनी छापा टाकला. जवळपास चार तास शोध मोहीम राबविल्यानंतर त्याला एका गॅलरीच्या कोपºयात लपून बसला असताना अटक केली. मात्र त्याने प्रकृती बिघडल्याचा बहाणा करीत स्थानिक महाराजा यशवंतराव हॉस्पिटलमध्ये (एमवाय) दाखल झाला. डॉक्टरांनी प्रकृती व्यवस्थित असल्याचा अहवाल दिला. त्याला मुंबईत घेवून येण्यासाठी ९ तारखेला न्यायालयात हजर करुन ‘ट्रांन्झिट रिमांड’ची मागणी केली. मात्र सोनीच्या वकीलांनी प्रकृती अस्वस्थ असल्याचे सांगितल्याने पुन्हा न्यायालयाने पुन्हा सर्व वैद्यकीय चाचणी घेण्याची सूचना केली. तेव्हापासून तो हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. गेले चार दिवस डॉक्टर त्याच्या टेस्टचे अहवाल आले नसल्याचे सांगत सोनीचा मुक्काम वाढत राहिले आहेत.ठकसेन सोनी हा स्थानिक आरोग्य मंत्र्यांच्या मर्जीतील असल्याने त्यांने रुग्णालयाला ‘मॅनेज’केले असल्याची चर्चा स्थानिक परिसरात आहे. ही बाब तपास अधिकाऱ्यांनी आर्थिक गुन्हा शाखेचे सहआयुक्त विनय चौबे यांना कळविल्यानंतर त्यांनी इंदोरच्या अप्पर महासंचालकांना कळविले. त्यांच्या सूचनेनुसार स्थानिक दोन उपायुक्तांनी रुग्णालयाला भेट देवून डॉक्टरांकडे विचारणा केली. मात्र सोनीचे पूर्ण रिर्पोट आले नसल्याचे सांगत डॉक्टर चालढकल करीत आहेत.जानकराज सोनी याने एचएसबीसी बँकेबरोबरच अन्य काही खासगी बॅँकांना कोट्यावधींना गंडा घातला असल्याचे सांगितले जाते. त्याबाबत तक्रार देवूनही बॅँकेकडून पूर्ण कागदपत्रे न मिळाल्याने त्याचा तपास प्रलंबित असल्याचे अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. त्याशिवाय जानकराज सोनी याच्यावर इंदोरमध्ये स्थानिक पोलिसांकडे आर्थिक फसवणूकीची गुन्हे दाखल असल्याचे तपास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.