लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बोगस मजूर प्रकरणी एमआरए मार्ग पोलीस ठाण्याने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर ९०४ पानी आरोपपत्र दाखल केले आहे. प्रवीण दरेकर यांच्यासह अंधेरी (पूर्व)चे रहिवासी श्रीकांत कदम आणि जोगेश्वरीचे (पूर्व) रहिवासी प्रवीण मर्गज यांच्यावरही आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. एमआरए पोलिसांनी हे आरोपपत्र बॅलार्ड पियर्ड येथील दंडाधिकारी न्यायालयात सादर केले.
या आरोपपत्रात दरेकरांवरील आरोप सिद्ध करण्यासाठी पोलिसांनी नोंदविलेल्या २९ साक्षीदारांच्या जबाबाचा समावेश आहे. तपास यंत्रणेने मजूर, बँक अधिकारी आणि जिम इन्स्ट्रक्टरच्या जबाबांचाही समावेश आहे. दरेकर आणि अन्य दोन आरोपी शुक्रवारी न्यायालयात उपस्थित होते. त्यावेळी दरेकरांचे वकील अखिलेश चौबे यांनी न्यायालयाला सांगितले की, दरेकर यांना उच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिले आहे. कारण ते तपास यंत्रणेला सहकार्य करत आहेत. ही बाब विचारात घेत न्यायालयाने औपचारिकरीत्या दरेकरांच्या अटकेचे आदेश दिले आणि त्यांची तत्काळ ३५ हजार रुपयांच्या जामिनावर तत्काळ सोडले.
दरेकर यांनी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक ‘मजूर’ कोट्यातून निवडणूक लढवली. निवडणूक लढवण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आरोप पोलिसांनी केला. तर, दरेकर यांनी विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जात त्यांची संपत्ती २.१३ कोटी असल्याचे दाखविले. एका मजुराची इतकी संपत्ती असू शकत नाही, असा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे.