मुंबई - मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्या मुदतवाढीची मुदत शनिवारी (30 नोव्हेंबर) संपत असली तरी त्यांना दुसऱ्यांदा तीन महिन्यांची मुदतवाढ दिली गेली आहे. त्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारने मंगळवारी तयार करून केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी सादर केला आहे. त्यावर आज शिक्कामोर्तब करण्यात आलं केले असे गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
राज्यातील सत्तांतरामुळे पोलीस दलात अनेक संदर्भ बदलणार आहेत. मात्र तूर्तास बर्वे यांना दुसऱ्यांदा मुदतवाढ मिळण्यात या सत्तांतराचा कसलाही अडसर होणार नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे या पदासाठी पूर्वीपासून चर्चेतल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक परमबीर सिंग व राज्य गुप्त वार्ता विभागाचे प्रमुख रश्मी शुक्ला यांना आणखी प्रतीक्षा करावी लागेल. महाविकासआघाडी सरकारमुळे या दोघांपेक्षा वरिष्ठ महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाचे कार्यकारी संचालक बिपीन बिहारी यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे हे १९८७ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. संजय बर्वे हे याआधी राज्य गुप्तचर विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. अत्यंत हुशार आणि शिस्तप्रिय अशी बर्वे यांची ओळख आहे.