मुंबई - गजबजलेल्या दादर परिसरात खरेदीसाठी होणाऱ्या गर्दीमुळे वाहतूक कोंडीची समस्या प्रकर्षाने पाहायला मिळते. या ऐन गर्दीत रानडे रोडवर गुरुवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराच्या मुलाच्या मालकीची गाडी डबल पार्किंगमध्ये उभी केल्याने सामान्य वाहनचालकांच्या अडचणीत आणखीन भर पडली. याबाबत दक्ष नागरिकांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकली आणि मुंबई पोलिसांनी देखील तातडीने दखल घेत या गाडीच्या चालकाकडून ४०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
दादर पश्चिम परिसरात रानडे रोड येथे गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांचा मुलगा रोहित क्षीरसागरच्या नावावर असलेली मर्सिडीज (एमएच ०४; जीझेड ००९९) गाडी डबल पार्किंग करुन उभी केली होती. यामुळे वाहतूक कोंडी झाली. अनेक वाहनचालकांनी गाडीच्या चालकास गाडी पुढे घेण्याची विनंती केली असता त्यांने रुबाबात उत्तर दिले. ‘मॅडम शॉपिंगसाठी गेल्या आहेत,’ असं सांगत या चालकाने गाडी हलवण्यास नकार दिला. अशी पोस्ट फेसबुक आणि ट्विटरवर अमोल परचुरे यांनी पोस्ट केली आणि अनेकांनी सोशल मीडियावरून मुंबई पोलीस या गाडीवर कारवाई करतील का?, आमदाराच्या गाडीवर कारवाई कधी? अशा संतप्त प्रतिक्रिया आल्या. शेवटी पंधरा मिनिटांनी पोलिसांनी या गाडीची दखल घेतली. गाडीचा चालक रफिक अहमद खान यांच्याकडून पोलिसांनी ४०० रुपयांचा दंड वसूल केला. दादर वाहतूक शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र तोंगरे यांनी ही कारवाई केली. मोठ्या आकाराची गाडी रस्त्याच्या मध्यभागी बेकायदेशीपणे उभी करुन वाहतूक कोंडीस कारणभूत ठरल्याबद्दल हा दंड आकारण्यात आला. हा संपूर्ण प्रकार जवळजवळ पंधरा ते वीस मिनिटे सुरु राहिला. तोंगरे यांनी गाडी बाजूला घेण्याचे आदेश दिल्यानंतर ही गाडी बाजूला घेऊन वाहतूक कोंडी सुटली. या वाहतूक कोंडीत अनेकांनी या कारवाईबद्दल सोशल मीडियावर देखील मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेचे आभार मानले. तसेच आमदाराच्या मुलाच्या नावावर असलेल्या गाडीवर आमदाराचा स्टिकर कसा आणि का? असा देखील सवाल उपस्थित केला जात आहे.