यवतमाळ: चाेरी साेन्याची यवतमाळात माेठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. महानगरातील गुन्ह्यामध्ये गेलेला मुद्देमाल यवतमाळात गाळला जाताे. मुंबईतील लाेकमान्य टिळक मार्ग पाेलिसांचे पथक दीड किलाे साेन व ३५ किलाे चांदीच्या शाेधात शनिवारी यवतमाळात पाेहाेचले. गुन्ह्यातील आराेपीने दाेन सराफांची दुकाने पथकाला दाखविली. यातील एका सराफाला मुंबईच्या पथकाने ताब्यात घेतले. या कारावाईने सराफा बाजारात खळबळ उडाली आहे.
मुंबईत सराफा व्यापाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. जवळपास चार काेटींच्या साेन्याचा अपहार झाल्याचे तक्रारीत आहे. याचा शोध घेतला जात आहे. त्या व्यापाऱ्याच्या नात्यातीलच व्यक्तीने अपहार केला. त्याने हडप केलेले सोने यवतमाळातील दोन सराफा व्यावसायिकांना विकल्याची कबुली दिली. २०२१ पासून आरोपी यवतमाळात सोने व चांदी देत होता. त्यावरून सहायक पोलीस निरीक्षक व इतर तीन कर्मचाऱ्यांच्या पथकाने तुलसी ज्वेलर्स व लष्करी ज्वेलर्सची झाडाझडती घेतली. त्यात तथ्य आढळून आल्याने एका सराफाला ताब्यात घेवून शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. शनिवारी सकाळपासून ही कारवाई सुरू होती. मुंबई पोलिसांच्या दिमतीला स्थानिक गुन्हे शाखेतील कर्मचारी देण्यात आले होते.
प्रकरण निस्तारण्यासाठी आमदारांचा भाऊ पुढे
दोन नंबरच्या व्यवसायात गुंतलेल्या आमदाराच्या भावाने पोलीस पथक सराफाकडे येताच घटनास्थळी धाव घेतली. तेथे त्याने पोलीस अधिकाऱ्याला आमदाराचा भाऊ असल्याचे सांगितले. इतकेच नव्हे तर आमदार साहेबांसोबत बोलून घ्या, प्रकरण येथेच रफादफा करा अशी विनवणी केली. यावर पोलीस अधिकाऱ्याने मी साधा सहायक निरीक्षक आहे. आमदार साहेबांना बोलायचे असेल तर वरिष्ठांशी बोलावे असे सांगून बोलणे टाळले. मात्र त्यानंतरही आमदारांचा भाऊ पूर्णवेळ कारवाई दरम्यान उपस्थित होता. सराफांना सोडविण्यासाठी त्याचा खटाटोप सुरू होता.
कवडीमाेल भावात साेने खरेदी
चाेरीचे साेने अतिशय कवडीमाेल भावात खरेदी केले जाते. त्याची नंतर बाजारभावप्रमाणे विक्री हाेते. या व्यवहारात बक्कळ पैसा मिळत असल्याने काही सराफा पाेलीस कारवाईलाही घाबरत नाही. शिवाय त्यांना स्थानिक राजकारण्यांचे पाठबळ मिळत आहे. चाेरीचे साेने खरेदी केल्यानंतर एखादा प्रकारणात पाेलीस तपासाकरिता येतात. सराफा खरेदी केलेल्या मुद्देमालासाेबतच दुप्पट रक्कम देवून सुटका करून घेतात. त्यामुळे चाेरट्यांचेही फावत आहे. स्पाॅट सेटींगचा हा प्रकार येथे प्रचलित झाला आहे. पाेलिसांनी मुद्देमाल हस्तगत केल्यामुळे फिर्यादीचाही आक्षेप राहत नाही. यातूनच चाेरीचे साेने घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. शिवाय शहरासह जिल्ह्यात सातत्याने चोरीच्या घटना होत आहे. सोनसाखळी चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. चोरीचे सोने खरेदीत स्वीट मार्ट व्यावसायिकाचा मुलगा आरोपी निघाला होता.