मुंबई - अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद खटल्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि उपनगरांमध्ये कलम १४४ अन्वये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आली आहे. त्यातच उद्या ईद - ए - मिलाद सणानिमित्त कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांतर्फे चोख बंदोबस्ताचे आयोजन करण्यात आले आहे.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता सुरक्षिततेच्या दृष्टीने मुंबई पोलिसांतर्फे ४० हजारपेक्षा अधिक पोलीस अधिकारी व अंमलदार बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहेत. मुंबईच्या सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस ठाण्याचे स्थानिक बंदोबस्त तसेच सशस्त्र दल, राज्य राखीव पोलीस बल, दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक, बीडीडीएस, विशेष शाखा, गुन्हे शाखा, मुंबई वाहतूक विभाग आणि १६५० होमगार्ड असा बंदोबस्त पुरविण्यात येणार आहे.
खिलाफत हाऊस भायखळा येथून निघणाऱ्या मिरवणुकीसाठी तसेच इतर ठिकाणच्या मिरवणुकीत गर्दीच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही आणि ड्रोनद्वारे निगराणी ठेवण्यात येणार आहे आणि सध्या वेशातील पोलीस पथकांची सतर्क गस्त ठेवण्यात येणार आहे. मुंबई वाहतूक शाखेकडून रहदारी योग्यरीत्या नियंत्रित केली जाणार असून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. तसेच कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास नागरिकांनी १०० या क्रमांकावर संपर्क साधावा अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रवण अशोक यांनी दिली आहे.