मुंबई – बनावट टीआरपी घोटाळ्यात अडचणीत आलेल्या रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना मुंबई पोलिसांनी आणखी एक दणका दिला आहे. सीआरपीसीच्या कलम १०८ नुसार त्यांच्यावर कारवाई का करू नये, असा सवाल करत मुंबई पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर जांबावडेकर यांनी अर्णबला १६ ऑक्टोबरला हजर राहण्यास सांगितले आहे.
नोटीसमध्ये दोन घटनांचा प्रामुख्याने उल्लेख केला आहे. यात पालघर जिल्ह्यातील साधूंची हत्या आणि वांद्रे येथील लॉकडाऊन दरम्यान प्रवाशांचा जमाव, या मुद्दय़ावरून गोस्वामी आणि त्यांच्या वाहिनीने या घटनांना जातीयवाद रंग देऊन हिंदू आणि मुस्लिम यांच्यात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला असा आरोप केला आहे. मुंबईत अर्णब गोस्वामीविरोधात दोन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. एन.एम. जोशी मार्ग पोलीस स्टेशन आणि पायधुनी पोलीस स्टेशन याठिकाणी या गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. दोन्ही गुन्ह्यांमध्ये अर्णबविरोधात दोन समुदायांमध्ये असंतोष आणि जातीय तणाव निर्माण केल्याचा आरोप आहे.
एन.एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक यांनी एसीपी यांना अर्णब गोस्वामीविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचा प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावावर एसीपीने कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. विशेष कार्यकारी दंडाधिकारी एसीपी जांबवेडेकर यांनी या कारवाईची पुष्टी केली आहे परंतु कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. पोलिसांनी बजावलेल्या नोटीशीत अर्णब गोस्वामी यांना प्रक्षोभक वक्तव्य करणार नाही, असे लेखी बंधपत्र द्या, तसेच १० लाख रुपये जामिनीसाठी भरावे लागणार आहेत. जामीनदार अर्णब गोस्वामीच्या वागणुकीवर नियंत्रण ठेवणारे हवेत असं म्हटलं आहे.
रिपब्लिक भारत या चॅनेलवरील पूछता है भारत आणि इंग्रजीतील द डिबेट हे प्राईम टाईम शो अडचणीत आले आहेत. हिंदू-मुस्लीम समाजात तेढ आणि द्वेष निर्माण करणारी विधाने यातून केली जात असल्याचं एन.एम जोशी मार्ग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली. त्याआधारे पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत ही नोटीस बजावली आहे. यासाठी १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता न्यायालयात समक्ष हजर राहण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.