मुंबई - भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात ६ डिसेंबरला वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या टी-20 सामन्याला सुरक्षा पुरवण्यास मुंबई पोलिसांनी असमर्थता व्यक्त केली आहे. त्यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तसंजय बर्वे यांची भेट घेऊन सामन्याला सुरक्षा देण्याची विनंती केली.अयोध्येतील बाबरी मशीद ६ डिसेंबर १९९२ रोजी पाडण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या हिंसाचारामुळे हा दिवस संवेदनशील मानला जातो. त्याचबरोबर अयोध्या निकाल सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिल्याने ६ डिसेंबरला सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर विशेष महत्त्व आले आहे. त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनासाठी ६ डिसेंबरला लाखो अनुयायी मुंबईत दादर, चैत्यभूमी येथे दाखल होतात. त्यामुळे मरिन लाईन्स येथील वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या भारत-वेस्ट इंडीज टी-20 क्रिकेट सामन्याला सुरक्षा देणे शक्य नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले असल्याची माहिती पोलीस आयुक्त प्रणय अशोक यांनी दिली आहे. त्यानंतर एमसीएच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्या भेटीची वेळ मागितली होती. त्यानुसार एमसीएच्या शिष्टमंडळाने आज पोलीस आयुक्त बर्वे यांची भेट घेऊन चर्चा केली. मुंबई पोलिसांकडे मनुष्यबळ अपुरे असल्यामुळे क्रिकेट सामन्यादरम्यान वानखेडे स्टेडियमला सुरक्षा देण्यास पोलिसांनी नकार दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे हा सामना होण्याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, याबाबत पोलीस आयुक्त आणि एमसीएच्या भेटीबाबत पोलिसांकडून अधिकृत माहिती मिळू शकली नाही. एमसीएने अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतला नसल्याचे सांगण्यात आले आहे.
भारत-वेस्ट इंडीज क्रिकेट सामन्याला सुरक्षा पुरवण्यास मुंबई पोलीस असमर्थ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 9:58 PM
मरिन लाईन्स येथील वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या भारत-वेस्ट इंडीज टी-20 क्रिकेट सामन्याला सुरक्षा देणे शक्य नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले
ठळक मुद्देअयोध्येतील बाबरी मशीद ६ डिसेंबर १९९२ रोजी पाडण्यात आली होती. अयोध्या निकाल सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिल्याने ६ डिसेंबरला सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर विशेष महत्त्व आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनासाठी ६ डिसेंबरला लाखो अनुयायी मुंबईत दादर, चैत्यभूमी येथे दाखल होतात.