मुंबई - वयाच्या दुसऱ्या महिन्यापासून मुंबई पोलीस दलात दाखल होणारी हीना आणि विकी हे श्वान १० वर्षांच्या सेवेनंतर आज निवृत्त झाले. हीनाची कामगिरी कौतुकास्पद असून तिने आपल्या १० वर्षांच्या सेवेत अनेक महत्वाच्या गुन्ह्यांचा छडा लावला.
२४ जानेवारी २००८ ला हीनाचा जन्म झाला. हीना दोन महिन्यांची असताना मुंबई पोलिसांच्या श्वान पथकाने हीनाला घेतलं आणि पोलीस श्वान म्हणून तिच संगोपन केलं. काही महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर हीनाला पोलीस श्वानाचा दर्जा मिळाला आणि तेव्हापासून आजपर्यंत पोलीस श्वान ही पदवी हीनाने अगदी लिलया पेलली. तब्बल १० वर्षांच्या सेवेनंतर हीना आणि विकी हे दोन डॉग स्कॉडमधील श्वान आज सेवानिवृत्त झाले आहेत.
गेल्या दहा वर्षात हीनाने अनेक गुन्ह्यांचा छडा लावला. काही वर्षापूर्वी भोईवाडा परिसरात फुटपाथवर झोपलेल्या एका तरूणाची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आला होती. घटनास्थळी कोणताही पुरावा नव्हता असं असलं तरी हीनाला घटनास्थळी नेताच तिने अवघ्या काही मिनिटात गुन्ह्याचा छडा लावला. हीनाच्या हँडलरने तिला दगडचा वास दिला आणि हीना थेट हत्याराच्या घरीच पोहोचून थांबली. कुर्ल्याच्या नेहरू नगरमध्ये लहान मुलीच्या हत्या आणि बलात्काराच्या केसेसचा छडा लावण्यात देखील हीनाचा मोलाचा वाटा आहे. काही महिन्यांपूर्वी खार परिसरातील जेष्ठ नागरिक दाम्पत्तची हत्या असो का हीनाला दिलेल्या इतर केसेस असो प्रत्येक ठिकाणी तिने अपेक्षेपेक्षा चांगलीच कामगिरी बजावली म्हणूनच अनेक पुरस्कार देऊन गौरवण्यात देखील आलं आहे.
गेल्या १० वर्षांपासून हीनाचे हँडलर उमेश सापते आणि विकास शेंडगे हे रात्रंदिवस हीना सोबतच असायचे. हीना सकाळी उठल्यावर तिला खायला देणं, तिच्याशी खेळणं, तिला गुन्हा घडल्याच्या ठिकाणी नेऊन हीनाचे इशारे समजणं हे प्रत्येक काम तिचे हँडलर्स करायचे. आता हीना जरी निवृत्त होत असली तरी तिचे हँडलर्स मात्र पोलीस खात्यात आणि ते पण श्वान पथकातच असणार आहेत. असं असताना हीना नसताना काम करायचं तरी कसं आपला जीव रमवायचा तरी कोणात असा प्रश्न तिच्या हँडलर्सना पडला आहे.