मुंबई - दहावीचा युनिट टेस्टमध्ये गणिताचा पेपर कठीण गेला म्हणून आई-वडिलांना घाबरून घर सोडून पुण्याहून मुंबईत आलेल्या १५ वर्षीय मुलीला सीएसएमटी रेल्वेपोलिसांनी तिच्या पालकांकडे सुपूर्द केले आहे. ती हरविल्याबाबत पुण्यातील भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल असून तिला सुखरूप पालकांकडे सोपवले असल्याची माहिती सीएसएमटी लोहमार्ग पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत बावधनकर यांनी लोकमतशी बोलताना दिली.
काल रात्री १२.३० वाजताच्या सुमारास पुण्याहून १५ वर्षीय मुलगी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानकात भरकटलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आली. त्यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त सुजाता पाटील यांच्यासह सीएसएमटी लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत बावधनकर यांनी या मुलीला विश्वासात घेऊन तिच्या वडिलांचा संपर्क क्रमांक विचारला आणि तिला पोलिसांनी समजूत काढून तिला तिच्या वडिलांच्या स्वाधीन केले असल्याची माहिती बावधनकर यांनी दिली. सुजाता पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार या मुलीला दहावीच्या परीक्षेचा पेपर कठीण गेला होता. त्यानंतर शाळेत तिच्या पालकांना बोलावून याबाबत माहिती देण्यात आली होती. दरम्यान, मुलीला पालक शाळेतून घरी घेऊन आले. त्यांनतर, आई - वडील घरी काहीतरी बोलतील या भीतीने तिने घर सोडले आणि थेट पुण्याहून दादरला आली. दादरहून तिने नंतर सीएसएमटीला येणारी लोकल पकडली आणि रात्री १२.३० वाजताच्या सुमारास ती सीएसएमटी रेल्वे स्थानकातील बाहेरगावी जाणाऱ्या गाड्याच्या हॉलमध्ये भरकटलेल्या अवस्थेत पोलिसांना सापडली. तिच्यासोबत रात्री - अपरात्री कोणताही गैरप्रकार होऊ नये म्हणून आम्ही ताब्यात घेतलं. तिची समजूत काढून तिच्या वडिलांचा संपर्क क्रमांक मिळविला. अशा प्रकारे पोलिसांच्या सतर्कतेमुळे घर सोडून आलेल्या अल्पवयीन मुलगी तिच्या पालकांपर्यंत सुखरूप पोचली.