मुंबई - मुंबई सुरक्षित आहे, होती आणि नेहमी असणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी काळजी करू नये. मुंबई पोलीस नेहमीच तुमच्यासोबत आहेत, असे मुंबई पोलीस आयुक्त पदाचा नव्याने पदभार स्वीकारल्यानंतर नवविर्वाचीत पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी सांगितले. त्याचबरोबर मुंबईकरांना सतर्क राहण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
मुंबई पोलीस दल असो, एटीएस असो राज्य पोलीस दल असो सर्वाचं एकाच ध्येय आहे सुरक्षेचं आणि वर्दीचा खाकिचा रंगही एकच आहे. त्यामुळे आम्ही सर्व पोलीस एक आहोत. पुलवामा हल्ल्यानंतर सध्याची परिस्थिती लक्षात घेता रस्त्यावरिल बंदोबस्ताकड़े विशेष लक्ष असणार आहे. रेल्वे पोलीस, हवाई सुरक्षा दल तसेच अन्य तपास यंत्रणाच्या मदतीने सुरक्षेची काळजी घेत आहोत. दिवसेंदिवस सायबर गुन्हे वाढ़त आहेत. सायबर गुन्ह्यावर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढ़ण्यासाठी प्रयत्न असेन असेही बर्वे यांनी यावेळी नमूद केले.
कोण आहेत संजय बर्वे?मुंबईचे ४२ वे आयुक्त बनलेले संजय बर्वे हे १९८७ च्या बॅँचचे आयपीएस अधिकारी असून यापुर्वी उपायुक्तपद ते सहआयुक्त पदापर्यत मुंबई पोलीस दलातील विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. मुंबई वाहतुक शाखेत २००९ -१० मध्ये काम पाहताना महानगरातील वाहतुक व्यवस्थेला खऱ्या अर्थाने वेगळे वळण लावले होते. य काम पाहिले आहे. त्यानंतर त्यांनी पोलीस अकादमीचे संचालक, राज्य गुप्त वार्ता विभागाचे आयुक्त, सुरक्षा महामंडळाचे कार्यकारी संचालक व एसीबीचे प्रमुख म्हणून काम पाहिले आहे. गेली पाच महिने १० दिवस एसीबीचे महासंचालक म्हणून काम पहाताना भ्रष्ट लोकसेवकावर कारवाईचा बडगा उगारला होता. त्यामध्ये मुंबईतील लाचखोर पोलिसांवर अनेक कारवाई केल्या आहेत. त्यामुळे आता मुंबईची धुरा सांभाळताना भ्रष्ट पोलिसांची साफसफाई अधिक गतीने होईल, अशी अपेक्षा आहे.पोलीस आयुक्त पदाच्या शर्यतीत बर्वे यांचे नाव अहमद जावेद यांच्यानंतर चर्चेत होते. मात्र अंतिम क्षणी त्यांना या पदाने हुलकावणी दिली होती. अखेर सेवानिवृत्तीला ६ महिन्याचा कालावधी शिल्लक असताना त्यांना या पदाने गवसणी घातली. देशात वादग्रस्त ठरलेल्या कुुलाब्यातील आदर्श सोसायटी घोटाळ्यात बर्वे यांच्या वडीलांच्या नावे फ्लॅट होता. त्यामुळे सीबीआयने त्यांच्याकडेही चौकशी केल्यानंतर त्यांना क्लिनचिट’ दिली होती. ३० सप्टेंबरला ते सेवानिवृत्त होणार असून तत्कालिन परिस्थितीनुसार त्यांना राज्य सरकारकडून ३ महिन्याची मुदतवाढ मिळू शकते.